
Ajit Pawar : अजित पवार हे कर्जमाफीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांवर भडकल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी केलेल्या विधानाचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘पैशांचं सोंग आणता येत नाही मग सरकार चालवू नका’ अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. तर विजय वडेट्टीवारांनी देखील दादांना कोंडीत पकडलं आहे. पाहुयात यासंदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडलाय. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी नेतेमंडळी थेट बांधावर पोहोचलेत. अजित पवार आज सकाळपासून पायाला भिंगरी लावून बीड जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. मात्र, शेतकऱ्यानं कर्जमाफीचा प्रश्न केल्यानं अजित पवार बीडमध्ये चांगलेच भडकलेत. सगळी सोंग करता येतात मात्र, पैशांचं सोंग करता येत नाही असं म्हणत दादांनी शेतकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे.
अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत राहणार का?
अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. आधी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आणि आता शेतकरी आत्महत्या अजित पवार बघणार का? असा सवाल करत वडेट्टीवारांनी दादांना धारेवर धरलं. तर दादांनी केलेल्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी दादांची पाठराखण करत विधानावर सारवासारव केली.
बीड जिल्ह्यातही मोठा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतायत. तसंच शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन देखील त्यांनी केलं आहे. तसंच एका तलावाच्या कामावरून अजित पवार यांनी थेट जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याला झापलं आहे.
दादांसमोरच महिलेनं फोडला हंबरडा
हिंगणी खुर्द गावात एका महिलेनं अजित पवारांसमोर हंबरडा फोडला. माझ्या मोबाईलवरुन कुणीतरी पैसे काढून घेतले अशी व्यथा या महिलेनं अजित पवासांसमोर मांडली. मला मदत करा अशी साद या महिलेनं अजित पवारांना घातली. सध्या पुरामुळे ग्रामस्थांपुढे मोठं संकट ओढवलं आहे. अशातच मोबाईलवरून पैसे काढून घेतल्यानं शेतकरी महिला पुरती हतबल झाली आहे.
अजित पवारांनी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय. मदतीचं आश्वासन देखील दिलं आहे. मात्र कर्जमाफीच्या प्रश्नावरून दादांनी केलेल्या संतापानंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले आहेत. कृषीमंत्री असताना माणिकराव कोकाटे देखील कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चांगलेच वादात सापडले होते आणि आता दादांनी देखील याच मुद्दयावर विधान करत वाद ओढावून घेतला आहे.
FAQ
अजित पवार बीड दौऱ्यावर कधी गेले?
अजित पवार २५ सप्टेंबर २०२५ रोजी बीड (धाराशिव) जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सकाळपासून दौऱ्यावर गेले.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजित पवार काय म्हणाले?
एका तरुण शेतकऱ्याने कर्जमाफीची मागणी केल्यावर अजित पवार भडकले आणि म्हणाले, “सगळी सोंग करता येतात, पण पैशांची सोंग करता येत नाही. आम्ही गोट्या खेळायला आलोय का?”
संजय राऊत यांची टीका काय?
संजय राऊत म्हणाले, “पैशांची सोंग करता येत नाही तर सरकार चालवू नका.” त्यांनी अजित पवारांच्या विधानावर जोरदार हल्लाबोल केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.