
चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच मिळणार आहे. शासनाने तालुक्यासाठी ८ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
.
या निधीमध्ये ब्राह्मणवाडा थडी आणि देऊरवाडा या दोन महसूल मंडळांचाही समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी पर्जन्यमापक सदोष असल्यामुळे अतिवृष्टीची चुकीची माहिती नोंदवली गेली होती.
स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांनी शासन स्तरावर या रकमेसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे शासनाने ८ कोटी १९ लाख ९५ हजार ८८० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
मे महिन्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळी, सोयाबीन, संत्रा, पालेभाज्या आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुमारे ५ हजार ३९४ शेतकऱ्यांचे ३ हजार ७२६ हेक्टर क्षेत्रातील पिके खराब झाली होती.
आमदार प्रवीण तायडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला होता.
ही मदत नागरवाडी, विश्रोळी, घाटलाडकी, वणी, कुरणखेड, निमखेड, बेलमंडळी, सुरळी, बेसखेडा, रेडवा, चिंचकुंभ, पिठोडा, हिवरादेवी, सांबोरा, वारोळी, परसोळा यासह ब्राह्मणवाडा थडी महसूल मंडळातील सर्व गावांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिरजगाव कसबा महसूल मंडळातील देऊरवाडा गावाचाही त्यात समावेश आहे.
नुकसान भरपाईसाठी दोन हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आली आहे. संत्रा पिकाला हेक्टरी नवीन दरानुसार २२ हजार ५०० रुपये तर बागायती शेतीला १७ हजार रुपये प्रतिहेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.