
Manoj Jarange Maratha Morcha day 2 : मराठा आरक्षण घेऊनच जाणार आणि त्यासाठी आमरण उपोषणाचा एल्गार करत मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात असंख्य मराठा आंदोलकांसह हजेरी लावली. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा दक्षिण मुंबईत चक्काजाम झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त आंदोलकांनी सीएसटी स्थानक आणि पालिका मुख्यालयासमोर ठिय्या मांडल्याचं कळताच मनोज जरांगे यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचा स्पष्ट इशारा दिला.
आम्हाला कोणाचं आरक्षण हिरावून घ्यायचं नाही..
‘ओबीसींचं आरक्षण काढून आम्हाला द्या असं आम्ही म्हणत नसून आमचं आरक्षण आम्हाला द्या असं आम्ही म्हणत आहोत. कृपया संभ्रम निर्माण करु नये. ओबीसींच्या 32 टक्के आरक्षणातून 20 टक्के आरक्षण मराठ्यांना द्या असं आम्ही म्हणत नाही. मराठा, कुणबी हा एकच आहे हे समजून घ्या. राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे, असं जरांगे स्पष्ट म्हणाले.
मराठा आंदोलकांनी दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर आणलेली वाहनं आणि सद्यस्थिती पाहता ‘तुमची वाहनं पोलिसांनी दिलेल्या पार्किंगमध्ये लावा, कॉटनग्रीन, मस्जिद बंदर, शिवडीला पार्किंग आहे तिथं लावा. गाड्या सुरक्षिक ठिकाणी लावा. पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडीत जाऊन झोपला येईल, रेल्वेनं आझाद मैदानावर दोन मिनिटात याल. वाशीला गाड्या लावा. आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे. समजून घ्या गोंधळ घालणाऱ्यांना घालूदेत, पण त्यांना सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा सध्या शांततेत ठेवा. बघू ना किती दिवस चालणार हे, आरक्षण देतात की नाही, त्यांची (सरकारची) काय इच्छा आहे बघू…’, असं ते म्हणाले.
ठिय्या मांडणाऱ्या आंदोलकांना म्हणाले…
‘आंदोलकांना सुविधा देणं हे प्रशासनाचं काम आहे. आयुक्तांचं काम आहे ना… पोरं वैतागलीयेत. बीएमसी आणि सीएसटीसमोरील पोरांना विनंती आहे शांततेनं घ्या’, अशा शब्दांत जरांगेंनी आंदोलकांना आवाहन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्याचंही पाहायला मिळालं.
मुख्यमंत्री साहेब संधी आहे, मराठे कधीत तुम्हाला विसरणार नाहीत…
‘पोरांना विनंती आहे, होऊ दे हाल… तुम्ही आझाद मैदानात या. पोलिसांना विनंती पोरांना डिवचू नका. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, म्हणून पोरं वैतागली. भाजपमधील काम करणाऱ्या मराठ्यानं समजून घ्यावं की तुमचे मुख्यमंत्री गोरगरिब मराठ्याच्या पोरांना किती त्रास देतायत. हॉटेलं, शौचालयं बंद करायला सांगितलं. मुख्यमंत्रीसाहेब हा गैरसमज दूर करा. एकच विनंती, मराठ्यांना आरक्षण द्या, मराठ्यांचा शब्द मान्य करा. मराठे तुम्हाला कधी विसरणार नाहीत. ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. तुमच्यामुळं अमित शाह आणि मोदीसाहेबांनाही अडचण येईल’, असा सूचक इशारा जरांगेंनी दिला.
आपल्याला मुंबई सांभाळायची आहे…
आम्ही शांततेच्या मार्गानं जाणार असं सांगताना त्यांनी वारंवार आक्रमक आंदोलकांना आझाद मैदानाकडे येत सीएसटीचा मार्ग मोकळा करण्याचं आणि मुंबई मोकळी करण्याचं आवाहन केलं. ‘मुंबई आपली आहे. आपल्याला मुंबई सांभाळायची आहे. रोडवर लावलेल्या गाड्या मैदानात लावा, गैरसमज करू नका’, असं सांगत जरांगेंनी आपण आरक्षण अंमलबजावणीशिवाय माघार घेणार नाही असा निर्धारही करत पोलिसांनाही सहकार्याची विनंती केली.
कार्यकर्त्यांना त्यांनी तातडीनं आझाद मैदानातून सीएसएमटीच्या दिशेनं जाण्यास सांगत तेथील आंदोलकांना आझाद मैदानावर पाठवा अशा सूचना केल्या. ‘मी शेवटचं सांगतो पोरांना गोरगरिब मुंबईकरांना त्रास होता कामा नये. जे जे उड्डाणपूलावर गाड्या असतील तर त्या काढा आणि मैदानावर लावा. पोलिसांनी कृपया सहकार्य करावं. मी कोणाच्या आश्वासनावर उपोषण मागे घेणार नाही. राज्य अस्थिर होता कामा नये’, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.
FAQ
मराठा आरक्षण आंदोलनाची मुख्य मागणी काय आहे?
मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण हिरावून घेण्याच्या बाजूने नाहीत, तर मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळावा अशी त्यांची मागणी आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केव्हा केली?
मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट 2025 रोजी ‘चलो मुंबई’ मोर्चाची घोषणा केली आणि 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर शांततापूर्ण आंदोलन सुरू केलं.
आझाद मैदानावरील आंदोलनासाठी पोलिसांनी काय बंदोबस्त केला आहे?
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर 1,500 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे, तसेच सीआरपीएफ, रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF), आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तुकड्याही तैनात आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.