
अमरावती जिल्ह्यात संच मान्यतेमुळे २०० हून अधिक शिक्षकांच्या नोकरीवर टाच आली आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवताना संबंधित शाळेतील केवळ आधार कार्ड उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या विचारात घेतली जात आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशी असूनही २०० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे प्राथमिक शिक्षक समितीने आघाडी घेतली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांची भेट घेऊन या संदर्भात मागणी केली आहे. संच मान्यतेसाठी आधार कार्ड वैध पटसंख्या विचारात न घेता, शाळेत प्रत्यक्ष प्रवेशित आणि उपस्थित विद्यार्थी संख्या विचारात घ्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. संघटनेने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये फेब्रुवारी २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागा रिक्त दाखवाव्यात, तसेच समानीकरणाच्या जागाही रिक्त म्हणून विचारात घ्याव्यात, असा आग्रह प्राथमिक शिक्षक समितीने धरला आहे. २०२५-२६ च्या विद्यार्थ्यांची वैध आधारकार्ड संख्या गृहीत धरून संचमान्यता नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थी संख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य न धरल्यामुळे बऱ्याच शाळांमधील शिक्षकांची पदे धोक्यात आली असून, अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढली आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. यानुसार, अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा दाखवण्यात याव्यात. अमरावती जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे समायोजन २० फेब्रुवारी रोजी करण्यात यावे आणि तालुक्यात अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची माहिती २४ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा कार्यालयाला सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे, तालुकाध्यक्ष तुळशीदास धांडे, भातकुलीचे उमेश चुनकीकर व संतोष राऊत, प्रसिद्धीप्रमुख राजेश सावरकर आदी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



