
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये राज्य व देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. याचवेळी राऊतांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशनाचे आमंत्र
.
शरद पवार यांनी या भेटीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. यावेळी त्यांनी या भेटीतील काही फोटो देखील शेअर केलेत. राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, राज्य व देशातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन झाले. भेटीनंतर मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या, अशी पोस्ट शरद पवार यांनी केली.
17 मे पुस्तकाचे प्रकाशन
दरम्यान, संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन 17 मे रोजी होणार आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे हा प्रकाशन समारंभ पार पडणार आहे. या कार्यकर्माला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभेचे खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर कवी, गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
पुस्तकात राऊतांच्या तुरुंग काळातील अनुभव कथन
सुमारे दोन वर्षांपूर्वी, संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक झाली होती. त्यावेळी जवळपास शंभर दिवसांचा काळ त्यांनी तुरुंगात व्यतीत केला होता. त्यांच्या तुरुंगातील याच काळातील अनुभवावर हे पुस्तक आधारित आहे. या पुस्तकातून सरकार, ईडी, तपास यंत्रणा साऱ्यांचीच पोलखोल केली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये हे पुस्तक असणार असून हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अनुवादित पुस्तक दिल्लीत प्रकाशित होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी दिली होती. गौप्यस्फोट करणे हा या पुस्तकाचा हेतू नाही. जीवनातील अनुभव कथन करणे, त्याला गौप्यस्फोट म्हणता येणार नाही. जे पाहिले, अनुभवले ते सत्य कथन असते, त्याला सत्यकथन म्हणा, असेही संजय राऊत म्हणाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.