
अहिल्यानगरमध्ये एमआयएमची जाहीर सभा झाली. या सभेत असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी आक्रमक भाषणं केली. जलील यांनी मंत्री नितेश राणेंसह आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता नितेश राणेंनीही जोरदार पलटवार केला आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यात काही नेत्यांकडून, लोकप्रतिनिधींकडून भडकाऊ भाषणं केली जात आहेत. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, आपल्या आक्रमक भाषणशैलीमुळे चर्चेत असलेल्या खासदार असदुद्दीन ओवैसींची अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आक्रमक भाषण करत भाजप नेते तथा कॅबिनेटमंत्री नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. “राज्यात कसले लोक आता उभे आहेत, जे आपली नवी प्रतिमा तयार करत आहेत. आधी एक छोटा चिंटू बोलायचा, आता तुमच्या शहरात एक चिकनी चमेली आली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
या टीकेला मंत्री नितेश राणेंनीही उत्तर दिलं आहे. उत्तर देताना ते म्हणाले की, “नितेश राणे असो, संग्राम जगताप असो…आम्ही काही व्यक्ती नाही, तर हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून तिथे बोलत आहोत. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बोलत आहोत. तुम्ही नितेश राणेला नाही तर हिंदू समाजाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहात, ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. एमआयएमच्या नावे हिरव्या सापांची वळवळ झाली. या राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार आहे. तुम्हाला राज्यातील वातावरण खराब करायचं असेल तर तुमच्या सभा होऊन द्यायच्या का याचा विचार करावा लागेल”.
जलील यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरही टीका केली आहे. जलील यांनी हिंदी चित्रपटातील एका गाण्याची उपमा देऊन संग्राम जगताप यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, याच सभेत एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनीही मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर वारीस पठाण यांच्या टीकेला नितेश राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे..धमक्या देऊ नका वेळ आणि ठिकाण कळवा असं प्रतिआव्हान राणेंनी दिलं आहे.
दरम्यान, अहिल्यानगरच्या नावावरून एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आणि नितेश राणेंमध्ये जुंपली. या सभेत ओवैसी यांच्याकडून सातत्यानं अहिल्यानगरचा उल्लेख अहमदनगर असा करण्यात आला होता .यावरुनच मंत्री नितेश राणे यांनी ओवैसींवर पलटवार केला आहे.
दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ओवैसींना उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात राहायचं असल्यास अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि ईश्वरपूर म्हणावंच लागेल, असं पडळकर म्हणाले आहेत.
सध्या राज्यात आय लव्ह मोहम्मदवरून वातावरण तापलं होतं. त्यानंतर MIMनं अहिल्यानगरमध्ये सभा घेऊन थेट मंत्री नितेश राणेंवरच निशाणा साधला आहे. येत्या काळात हा वाद कसा वळण घेणार, हे पाहावं लागणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



