
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या समतादूत विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी समतादुतांना समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. भारतीय संविधान, थोर समाज सुधारकांचे समतेचे विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, अट्रॉसिटी ऍक्ट, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय विभागाच्या योजना तसेच बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ येथील समतादुतांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. जोगदंड यांनी समतादूतांशी संवाद साधून त्यांना कोणकोणती कामे हाती घ्यावयाची याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, समतादुतांनी प्रत्यक्ष शहरातील प्रत्येक वस्तीत आणि खेड्यापाड्यात जाऊन नागरिकांचे प्रबोधन करावे. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरांचे उच्चाटन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करावी. विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधत गरजू लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. सामाजिक सलोखा व बंधुभाव निर्माण करण्यासाठी समतादुतांनी लोकांचे कल्याणदूत म्हणून काम करावे. येणारी पिढी समताधिष्ठित घडावी, यासाठी बार्टीच्या विविध योजना समाजापर्यंत पोहोचवाव्यात. तसेच सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाकरिता कार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी अनिता गवई-राऊत यांनी केले. यावेळी विभागातील जिल्हा प्रकल्प अधिकारी महेंद्र शामदे व विभागातील सर्व समतादूत उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



