
शेवांग रिगझिंग | लेह19 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
लडाखची राजधानी लेहमध्ये पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू आंदोलनाला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली आहे. लेह पोलिसांनी शुक्रवारी दुपारी २:३० वाजता वांगचुकच्या उल्याक्टोपो गावात नियोजित पत्रकार परिषदेपूर्वी ही कारवाई केली. एक दिवस आधी वांगचुक यांनी त्यांच्या अटकेबद्दल भीती व्यक्त केली होती आणि म्हटले होते की “या मुद्द्यावर कधीही अटक झाल्यास त्यांना आनंद होईल.’
सूत्रांनुसार, शनिवारी सकाळपर्यंत वांगचुक यांना लडाखमधून बाहेर काढण्यात येणार आहे. वांगचुक यांच्यावरील आरोपांबद्दल कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही, परंतु लडाख प्रशासनातील सूत्रांनी असे सूचित केले आहे की त्यांच्यावर कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत आरोप लावले जाऊ शकतात, जे जामीन न घेता दीर्घकाळ ताब्यात ठेवण्याची परवानगी देते.
दरम्यान, लडाख प्रशासनाने खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. २४ सप्टेंबरपासून लेहमध्ये संचारबंदी लागू आहे. लेहमधील आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. यात चार तरुणांचा मृत्यू झाला. यानंतर, गृह मंत्रालयाने वांगचुकवर जमावाला भडकावण्याचा आणि लडाखी नेते आणि केंद्र सरकारमधील संवाद बिघडवण्याचा आरोप केला. वांगचुकच्या एनजीओचा एफसीआरए परवानाही निलंबित करण्यात आला.
आधी दिल्ली, नंतर जोधपूरला केली रवानगी
जोधपुर| वांगचुक यांना लेह येथे अटक करून दिल्लीला नेले. तेथून त्यांना विशेष व्यवस्थेत जोधपूरला आणले गेले. त्यांना एअरफोर्स स्टेशनवरून मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. शुक्रवारी दुपारी ३ वाजता मध्यवर्ती कारागृहात तयारी सुरू झाली. रात्री ८:३० पोलिस-लष्करी गाड्या दाखल झाल्या. त्यांना ठेवलेल्या ठिकाणी जाण्याची कुणालाही परवानगी नाही.
मला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न
अटकेपूर्वी वांगचुक यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करुन सरकारच्या आरोपांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न म्हटले. ते म्हणाले, “मला तुरुंगात पाठवल्याने समस्या सुटणार नाही. दुही आणखी वाढेल .समस्या निर्माण होतील. पत्नी गीतांजली अंगमो म्हणाल्या, सरकार वांगचुक यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोट्या कथा पसरवत आहे. त्यांना गुन्हेगारासारखे वागवले गेले.
सरकारशी वाटाघाटींवर परिणाम शक्य
वांगचुक यांना सरकारकडून अटकेच्या कारवाईची अपेक्षा होती. म्हणूनच त्यांनी एक दिवस आधी म्हटले होते की, या मुद्द्यावर कधीही अटक करण्यात आल्यास मला आनंद होईल. तथापि, अटकेमुळे परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखी बिघडू शकते. लडाख प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधील सुरू असलेल्या चर्चेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. वांगचुक हे लडाखच्या हक्कांसाठी चळवळीतील एक प्रमुख चेहरा आहेत. या कारवाईमुळे लोकांत असंतोष निर्माण होऊ शकतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.