
निलेश खरमरे, झी मिडिया, पुणे: पहलगाम हल्ला देश आजही विसरलेला नाही.. त्यात 26 पर्यटकांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला.. त्याचा बदलाही भारतानं घेतला पण मृतांचे नातेवाईक आजही दु:खी आहेत.. सरकारनं दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता न केल्यानं कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलंय, नोकरीचं आश्वासन पूर्ण करावं, अशी मागणी वडलांना गमावलेल्या आसावरी जगदाळेंनी केलीय. एखादी दुदैर्वी घटना घडून कुणाचा मृत्यू झाला की तेवढ्यापुरतं सरकार आश्वासन देतं पण आम्ही कुटुंबियांच्या पाठीशी आहोत. त्यांना वा-यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली जाते. मात्र काही काळानं त्या घटनेची तीव्रता कमी होते परिणामी ती आश्वासनं अपूर्णच राहतात. याचाच अनुभव पहलगाम हल्ल्यात वडलांचं छत्र हरपलेल्या डोंबिवलीच्या आसावरी जगदाळेलाही आलाय.
“दिलेल्या आश्वासनानुसार सरकारी नोकरी मिळाली नाही” – आसावरी जगदाळे
22 एप्रिल 2025 हा दिवस देश कधीच विसरणार नाही. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून 26 पर्यटकांना जीवे मारलं. त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रूपये, मोफत शिक्षण आणि एका सदस्याला नोकरी देणार असं आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र दहा महिने उलटून गेले तरीही दिलेल्या आश्वासनानुसार सरकारी नोकरी मिळाली नाही, अशी खंत आसावरीनं व्यक्त केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र होऊ शकला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सगळ्या पीएना संपर्क करतोय पण आमचा संपर्क होत नसल्याचं आसावरीनं म्हटलं.
“जगदाळे कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी पाठपुरावा करणार” – नवनाथ बन
“घरातील कर्ता पुरुष अचानक निधन पावल्यामुळे जगदाळे कुटुंब सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. माझी शासनाला नम्र विनंती आहे की, आसावरी यांच्या नोकरीच्या प्रस्तावाची तातडीने दखल घ्यावी. पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या कुटुंबांबाबत एवढी संवेदनशीलता तरी हे सरकार नक्कीच दाखवू शकते. जे आश्वासन आम्ही दिलंय ते जरूर पूर्ण करू, असं भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय.” तर “जगदाळे कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी पाठपुरावा करणार”, असं आश्वासन भाजपा नगरसेवक नवनाथ बन यांनी दिलंय.
पहलहगाम हल्ला 2025
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीर मधील पहलगाम या गावात एक दहशतवादी हल्ला झाला. या क्रूर दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचे बळी गेले. या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारताने सिंदुर ऑपरेशन राबवले. ज्यामध्ये भारतीय सैन्याला पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात यश आले. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील स्वर्गासारखे दिसणारे आणि सर्व पर्यटकांची पहिली पसंती असलेले स्थळ एक भयानक स्वप्न बनून राहिले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



