
Maharashtra Rain Wet Drought Demand: “यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व ढगफुटीच्या घटनांनी मराठवाड्यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांत भयंकर पूरस्थिती ओढवल्याने अतोनात नुकसान झाले असतानाच आता परतीच्या पावसानेही मराठवाडा आणि लगतच्या सोलापूर व नगर या जिल्ह्यांनाही जाता जाता जबर तडाखा दिला. ओला दुष्काळ हे शब्ददेखील सौम्य ठरावेत, असा हाहाकार मराठवाड्यात उडाला असताना सरकार आणि प्रशासनाचा मात्र कुठेही मागमूस दिसत नाही,” अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.
सर्वात मोठे आव्हान
“ऑगस्ट महिन्यात ढगफुटीसारख्या अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा शेतातच चिखल झाला. त्यातूनही जे उरलेसुरले पीक तगले होते, तेही गेल्या तीन दिवसांतील पावसाने जमीनदोस्त केले. गेले तीन दिवस मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस कोसळतो आहे. धाराशिव व बीड जिल्ह्यात तर पावसाने कहरच केला. रात्रीतून धाराशिवच्या 24 तर बीडच्या 29 मंडळांत भयंकर अतिवृष्टी झाली. ऑगस्टपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे आधीच नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील सर्वच नद्या-नाल्यांना पूर आला व पात्र सोडून पुराचे पाणी शेतांमध्ये घुसले. अनेक गावांना पुराने वेढा घातला. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातून कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशला जोडणाऱ्या धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 2 किलोमीटरपर्यंत पुराचे पाणी साचले. चौसाळा येथे धुळे-सोलापूर महामार्गाला नदीचे स्वरूप आल्याने येथे दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नसल्याने तीन राज्यांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करणे हे प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात राज्यातील परिस्थितीबद्दल भाष्य करताना म्हटलंय.
…तर एकट्या मराठवाड्यातच 25 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
“सोलापूर जिल्ह्यातील नळदुर्गजवळ देखील पुराचे पाणी महामार्गावरून वाहते आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांसही रविवारी रात्री व सोमवारी सकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. अहिल्यानगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला. नाशिक ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत जायकवाडीच्या धरणापलीकडे असलेली सर्व 21 धरणे ओसंडून वाहत असल्याने पैठणच्या नाथसागराचे दरवाजे यंदाच्या पावसाळ्यात जुलैपासून आतापर्यंत पाचव्यांदा उघडावे लागले. जायकवाडीतून गोदापात्रात पडणारा पाण्याचा लोंढा अतिवृष्टीमुळे आधीच जर्जर झालेल्या जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत धडकत आहे. बीड जिल्ह्यात तर मे महिन्यापासूनच पावसाचे धुमशान सुरू आहे व गेल्या 50 वर्षांतील सर्वात मोठ्या पावसाची नोंद तिथे झाली आहे. यंदाच्या पावसाने शेतातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, मका ही पिके तर नष्ट केलीच; शिवाय केळी व काढणीला आलेला ऊसही आडवा केला. अतिव़ृष्टीने पिके व फळबागाच उद्ध्वस्त केल्या असे नाही; तर शेतातील मातीही खरवडून नेली. माती वाहून गेल्याने जमिनीचा जो पोत बिघडला ते नुकसान तर कधीही भरून न निघणारे आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर, जालना जिल्ह्यात 1 लाख हेक्टर, धाराशिव जिल्ह्यात सुमारे अडीच लाख हेक्टर, लातूर जिल्ह्यात 3 लाख हेक्टर, परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात 3 लाख हेक्टर, तर बीड व नांदेड या जिल्ह्यांत अनुक्रमे 4 लाख व 6.50 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही सोयाबीन व तुरीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांतील नुकसानीचे आकडे यात समाविष्ट झाले, तर एकट्या मराठवाड्यातच 25 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे
“सोलापूर जिल्ह्यातही 11 तालुक्यांपैकी 6 तालुक्यांत अतिव़ृष्टीमुळे 1 लाख 55 हजार शेतकऱ्यांच्या 1 लाख 35 हजार हेक्टरवरील शेतपिके उद्ध्वस्त झाली आहेत. गेले दोन महिने मराठवाड्यात कुठे ना कुठे ढगफुटी वा अतिव़ृष्टीने हाहाकार उडवला आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बीड, धाराशिव, लातूर व मराठवाड्यालगतच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतांचे रूपांतर तलावांत झाले व संपूर्ण पिकांचा चिखल झाला. एरव्ही कोरडा दुष्काळ अनुभवणाऱ्या मराठवाड्यास यंदा ओल्या दुष्काळाने रौद्ररूप दाखवले. मराठवाडा व सोलापुरातील लाखो शेतकऱ्यांची 27 लाख हेक्टरवरील सर्व पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांवर ओढवलेले आजवरचे हे सर्वात मोठे संकट आहे. सरकारने आता तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच नुकसानभरपाई व संपूर्ण कर्जमाफी देऊन हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. परतीच्या पावसाने मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत हाहाकार उडवला असताना सरकार कुठे गेले, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.