
कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी अहिल्यानगर
Shirdi Saibaba Silver Coins: शिर्डी साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवेतील निस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीची 9 नाणी भेट दिली होती. त्यावरून लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशजांमध्ये दावे – प्रतिदावे सुरू आहेत. त्यात झालेल्या तक्रारीनंतर अहिल्यानगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी वेळी प्रतिवादी हजर न राहिल्याने साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांचा दावा योग्य ठरवत सदर 9 नाणे हे ट्रस्टकडे असल्याचे चौकशी अहवालात नमुद केलं आहे. त्यामुळे आमच्याकडील नाणे हेच खरे असल्याचा दावा पुन्हा एकदा अरुण गायकवाड यांनी केला आहे. तर धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार असल्याचे तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.
1918 साली विजयादशमीच्या दिवशी साईबाबांचे महानिर्वाण झाले. अखेरच्या समयी साईबाबांना नित्यनियमाने भोजन आणि सेवा देणा-या साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना साईबाबांनी चांदीची 9 नाणी भेट दिली. लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज चंद्रकांत शिंदे आणि त्यांचे नातेवाईक सदर चांदीचे नाणे आमच्याकडे असल्याचा दावा करतायत तर लक्ष्मीबाई शिंदे यांची नात शैलेजा गायकवाड आणि त्यांचे कुटूंबीय चांदीची 9 नाणी आमच्याकडे असल्याचा दावा करत आहेत. 9 नाण्यांचे 18 नाणे झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संजय शिंदे , चंद्रकांत शिंदे यांनी 2022 साली साईबाबा संस्थान आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि 9 नाणे भाविकांना दाखवुन मोठ्या देणग्या जमा करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि विनीयोग तसेच नऊ नाणे हे अरुण गायकवाड अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडे असल्याच निरिक्षण नोंदवल्याच अरुण गायकवाड यांनी म्हटलं आहे.
लक्ष्मीबाई शिंदेंचे आम्ही वंशज आहोत त्यामुळे वारसाहक्काने ती चांदीची नाणी आमच्याकडे असून ती लक्ष्मीबाईंच्या नात शैलेजा गायकवाड यांच्याकडे कसे येतील? आजही साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली नाणी हि जुन्या घरी असलेल्या मंदिरातच आहेत आणि तीच खरी आहेत. धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेताना आम्हाला तारखेला हजर राहण्याची सुचना किंवा समन्स दिलेले नाही. त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालाविरोधात दाद मागणार असल्याचं यावेळी तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. सर्व नाण्यांची पुरातत्व विभागाकडून सत्यता तपासुन दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हाव अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
साईबाबांनी दिलेली चांदीची नऊ नाणी ही एक ऐतिहासिक, भक्तिपर आणि भावनिक ठेव आहे. मात्र, सध्या या नाण्यांवरून शिर्डीत मोठा वाद सुरू आहे. साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड आणि त्यांच्या मातोश्री शैलजा गायकवाड यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा चौकशी अहवाल पत्रकार परिषदेत मांडल्याने पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. देश विदेशातील करोडो भाविकांच्या श्रद्धेचे प्रतिक असलेल्या 9 नाण्यांची सत्यता खर तर जगासमोर येण गरजेचं आहे
कोण आहेत शैलेजा गायकवाड आणि साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड ?
शैलेजा गायकवाड (माहेरचे नाव शिंदे) या लक्ष्मीबाई शिंदे यांची नात तर सोनबाई यांची मुलगी आहे तर अरुण गायकवाड हे शैलेजा गायकवाड यांचे चिरंजीव आहेत.1963 साली लक्ष्मीबाई शिंदे यांचे निधन झाले आणि त्यानंतर चांदीचे नाणे त्यांची मुलगी सोनुबाई आणि त्यानंतर शैलेजा गायकवाड यांचेकडे आल्याचा दावा आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.