
Beed Crime : संतापजनक आणि मन हेलावून टाकणाऱ्या साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी महिला पोलीस शिपाई शितल एकनाथ कदम हिला गृह विभागाच्या आदेशाने निलंबित करण्यात आले आहे. मानसिक छळाला कंटाळून साक्षी कांबळेने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप शितल कदम या आरोपी महिला शिपायावर आहे.
14 मार्च 2025 रोजी धाराशिवमध्ये साक्षी कांबळे हिने छेडछाडीला कंटाळून मामाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शितल कदम आणि अभिषेक कदम या दोघांच्या मानसिक छळाला कंटाळून तिने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचं आता तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी गृह विभागाने शितल कदम हिच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. शितल कदम ही मुंबई रेल्वे पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत होती.
स्वप्नील राठोडची हकालपट्टी
साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी धाराशिवमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली होती. त्यानंतर तपासाची जबाबदारी तेथील डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र तपासाच्या सुरुवातीपासूनच गंभीर त्रुटी आल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेत या तपासातून स्वप्नील राठोड यांची हकालपट्टी केली. स्वप्नील राठोडकडील तपास काढून कळंब येथील पोलीस उपअधीक्षक संजय पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्य आरोपी अभिषेक कदम तब्बल 20 दिवसांनी स्वतःहून पोलिसांत हजर झाला होता. अवघ्या 7 दिवसांत त्याला जामीन देखील मिळाला यामुळे प्रकरणात गंभीर संशय निर्माण झाला होता.
साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस शिपाई निलंबित
या पार्श्वभूमीवर दुसरी आरोपी असलेल्या महिला पोलीस शिपाई शितल एकनाथ कदम हिला निलंबित करण्यात आलं आहे. गृह विभागाने ही कारवाई करत साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट केलं आहे. साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण आता न्यायाच्या निर्णायक वळणावर आहे. उशिरा का होईना, पण आरोपींवर केलेली ही कारवाई न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. दरम्यान साक्षी कांबळेची आई कोयना यांनी हे प्रकरण जलद गतीने चालवावे अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.