
ऊस शेतीत ‘एआय’ तंत्रज्ञान आलं पाहिजे, अशी भाषा मंत्री, कारखानदार करत आहेत. याला ‘स्वाभिमानी’चाही विरोध नाही; पण साखर कारखान्यातील काटामारी थांबविण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचाही वापर करावा. नुसते कारखानदारांच्या बाजूचे तंत्रज्ञान असेल तर मान्य होणार ना
.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार शेट्टी बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, खटाव तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर येवले, कायदेशीर सल्लागार चव्हाण, भुजबळ मामा, महादेव डोंगरे, शरद इंगळे, नितीन काळंगे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, अलीकडील काळात ‘एआय’ तंत्रज्ञान आलं पाहिजे, अशी वक्तव्ये होत आहेत. आमची भूमिका ही जगातील अत्युच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशीच आहे. साखर कारखानदारांनी लालचीपणाने कारखान्यांची गाळप क्षमता वाढवलीय. गेल्यावर्षी तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने तीन महिनेच चालले आहेत. आता कारखान्यांना उसाची गरज भासतेय. यासाठी एकरी १२५ टन उत्पादन निघाले पाहिजे, अशी कारखानदारांची भूमिका आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान चांगले; पण ते चोहोबाजूंनी असावे. राज्यात २०० कारखाने आहेत. या कारखान्यांत ऑनलाइन वजनकाटे करा. त्यामुळे वजनाशी छेडछाड होणार नाही, अशी मागणी ८ वर्षांपासून करीत आहोत; पण याकडे दुर्लक्ष होत आहे. आताचे ‘एआय’ तंत्रज्ञान हे कारखान्यातील काटामारी थांबविण्यासाठी ही वापरायला हवे.
पश्चिम महाराष्ट्रात शासनाने व्यापक धोरण राबवावे
ऊसाला कोयता लावण्यापूर्वी शेतकऱ्याला उत्पादन किती होईल, रिकव्हरी किती येईल, यासाठीचे तंत्रज्ञान यावे. यावरून शेतकरी ठरवेल ऊस आता घालायचा की महिन्याने असे सांगून माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले, सरकार शेतकऱ्यांवर सतत अन्याय करत आहे. सिंचनासाठी सौरऊर्जा पंप देण्यात येत आहेत. या पंपाने आवश्यक तेवढा दाब मिळत नाही. नवीन वीज कनेक्शन बंद केलीत. पश्चिम महाराष्ट्र हा डोंगरात आहे. त्यामुळे नदी, विहिरींतून दूर पाणी नेता येत नाही. यासाठी शासनाने व्यापक धोरण राबवायला हवे. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना फसवलं जात आहे.
आमदारांना लोक रस्त्यावर जोड्याने मारतील
विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान, आमदारांची बाचाबाची आणि कार्यकर्त्यांच्या मारहाणीबद्दलही शेट्टी यांनी भाष्य केले. राज्यात सरकार आहे कुठे हेच दिसत नाही. आम्ही निवडून दिलेले आमदार आणि कार्यकर्ते विधानभवनात मारहाण करतात. त्यांना रस्त्यावर जोड्याने मारतील, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी सर्व्हे करण्यात येत आहे; पण शेतकऱ्यांचा विरोध होतोय. त्यामुळे शासनाने कितीही रेटा निर्माण केला तरी तो होऊ देणारच नाही. त्याचबरोबर शक्तिपीठ मार्गात देवाची नावे घेतात. या देवांसाठी पूर्वीच रस्ते झालेले आहेत. या शक्तिपीठातून ५० हजार कोटी रुपये कमवायचे आहेत. पात्रादेवीचे नाव घेतले जाते; पण त्यापलीकडे गोवा राज्य लागते. या गोवा राज्यातील सीमेवरील गावातच १५-२० दारूची दुकाने आहेत. त्यासाठीच हा मार्ग नाही ना? दळणवळणाच्या सोयी हव्यात; पण शेतकऱ्यांचा बळी देऊन नको, असेही राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत सुनावले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.