
बारामती येथे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने शेतकऱ्याकडून 15 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. निंबूत कार्यालयातील सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. सोमनाथ संपत महानवर (वय 35, रा. गडदरवाडी, खंडोबाची वाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या मध्यस्थाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याने याबाबत तक्रार दिली होती. तक्रारदाराची बारामतीतील निंबूत परिसरात सहा गुंठे जमीन आहे, ज्याची भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी झाली होती. जमिनीच्या फाळणीनंतर सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तहसीलदारांनी पत्र दिले होते. तक्रारदार निंबूत येथील तलाठी कार्यालयात गेले असता, तिथे वावरणाऱ्या मध्यस्थ महानवर याने तलाठी जयश्री तनपुरे आणि मंडल अधिकारी मोहिते यांच्या नावाने प्रत्येक नोंदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये, असे एकूण 20 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. शेतकऱ्याच्या तक्रारीची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, मध्यस्थ महानवर याने तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महानवर याने तक्रारदाराला चार गुंठे जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंदणी झाल्याचा संदेश पाठवून पैसे पाठवण्यास सांगितले. या माहितीच्या आधारे, बारामती-नीरा रस्त्यावर खंडोबाची वाडी येथे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तडजोडीअंती पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महानवर याला रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीत महानवर हा तलाठी कार्यालयातील कर्मचारी नसल्याचे उघड झाले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



