
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरती प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग यांनी दिले आहेत. याबाबतचे अधिकृत पत्र ३० मार्च २०२६ रोजी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यातील कण्हेर खेड येथील श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. राज्य शासनाच्या अधिकृत यादीवरील मान्यता नसलेल्या एजन्सीला नोकर भरतीचे काम दिलेले आहे ते बंद करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांपासून सहकार आयुक्त यांच्यापर्यंत केली होती. या मागणीवर वरूनच ही नोकर भरती स्थगित करण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग तसेच सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (याचिका क्र. १६९१) प्रलंबित असून, अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबविण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. प्रतिक्षित उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण सदर भरती प्रक्रिया २०२४ मध्ये ‘वर्कवेल इन्फोटेक प्रा. लि.’ या एजन्सीमार्फत राबविण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही भरती तात्काळ स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, या आदेशाची अंमलबजावणी करून त्याचा अनुपालन अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याची प्रत कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयालाही पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने हायकोर्टात गेलो – किशोर शिंदे दरम्यान श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी यासंदर्भात सांगितले की, आमच्या संस्थेच्या वतीने यासंदर्भात सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे चेअरमन नितीन काका पाटील व इतरांच्याकडेही या संस्थेकडून भरती करू नये या संदर्भात तक्रारी अर्ज दिले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने आम्ही उच्च न्यायालयात यासंदर्भात गेलो आहोत. म्हणूनच आता सहकार खात्याला हे पाऊल उचलावे लागले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



