
थायलंडला फिरायला गेलेल्या कोरेगाव तालुक्यातील सहा मित्रांपैकी दोघांनी एका बीचवर जर्मन महिलेवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. पीडित महिलेने थायलंडमधील कोह फांगन पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर सीसीटिव्ही तसेच साक्षीदारांनी दिलेल
.
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातून सहा मित्र थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते. त्यातील दोघांनी थायलंडच्या सूरत थानी प्रांतातील कोह फांगन जिल्ह्यातल्या रीन बीचवर जर्मन महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून थाई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यासंदर्भात पीडित महिलेने कोह फांगन पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
थाई पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. तसेच काही साक्षीदार निष्पन्न करून माहिती घेतली. त्या आधारे दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. विजय दादासाहेब घोरपडे (वय 45, रा. चिलेवाडी, ता. कोरेगाव) आणि राहुल बाळासाहेब भोईटे (वय 41, रा. तडवळे संमत-वाघोली, ता.कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत.
या घटनेच्या संदर्भातील अधिकचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. यासंदर्भात कोरेगावच्या डीवायएसपी सोनाली कदम, पोलिस निरीक्षक घनःशाम बल्लाळ यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणाच्या संदर्भात आपल्याशी अद्याप कोणीही संपर्क साधला नसल्याची माहिती त्यांनी दिली.
संशयित आरोपींवर पुढे कशी कारवाई होऊ शकते, याबद्दल एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तेथे त्यांच्यावर खटला चालवला जाईल. दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागेल. त्यानंतर ते मायदेशात येऊ शकतील. जर भारत आणि थायलंड यांच्यात काही करार असेल तर संशयितांना भारतात पाठवले जाऊ शकते आणि नंतर दोषी ठरल्यास त्यांना तेथे शिक्षा भोगावी लागेल.
कोरेगाव तालुक्याच्या लौकीकाला डाग
साताऱ्यातील कोरेगाव तालुका हा अनेक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या नगरपालिकेची स्थापना स्वातंत्र्यूर्व काळात 1853 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. कोरेगावचा राजमा घेवडा हा देशाच्या राजधानीत प्रसिद्ध आहे. खाउच्या पानमळ्यासाठी आर्वी गाव तर नागझरी गाव हळद उत्पादणासाठी प्रसिद्ध आहे. रहिमतपूरचे रेल्वे स्टेशन ब्रिटिशकालीन असून स्वातंत्र्य संग्रामात याच रेल्वे स्टेशनवर स्वातंत्र्य सैनिकांनी रेल्वे अडवून ब्रिटिशांचा खजिना लुटला होता. मात्र, थायलंडमधील घृणास्पद घटनेने कोरेगाव तालुक्याच्या लौकीकाला डाग लागला आहे.
बिचुकले गावात जप्त केले होते 200 कोटींचे अंमली पदार्थ
मागील महिन्यात (फेब्रुवारी) नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई युनिटने कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावात छापा मारून 200 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करत चौघांना अटक केली होती. मुंबई, नवी मुंबईत जानेवारी महिन्यात कोकेन जप्त करण्यात आले होते. त्याचे कनेक्शन कोरेगाव तालुक्यात आढळून आले होते. त्यानंतर बिचुकले गावात एनसीबीच्या टीमने छापा मारून अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.