
रायगड आणि सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या परस्परविरोधी चित्र पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक संख्याबळ असूनही, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील प्रदीर्घ राजकीय वैमनस्यामुळे राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक साधली आहे. याउलट, साताऱ्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांचे राजकीय समीकरण चांगलेच जुळले आहे. त्यामुळे सर्वाधिक सदस्य असूनही साताऱ्यात सत्तेतील वाट्यासाठी भाजपला मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचे काउंटडाउन सुरू होताच रिझॉर्ट पॉलिटिक्सलाही उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या सदस्यांचा म्हैसूरमधील प्रसिद्ध वृंदावन गार्डन आणि पंचतारांकित हॉटेल रॉयल ऑर्किडसमोरील एक फोटो नुकताच व्हायरल झाला असून, त्यावरून महायुतीमधील हे दोन पक्ष सध्या दक्षिण भारताची सफर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदानाच्या तोंडावर आपली तटबंदी मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य कर्नाटक आणि केरळमध्ये ही राजकीय सहल एन्जॉय करत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक 20 मार्च रोजी होणार असून, त्यासाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. कमळ चिन्हावर निवडून आलेले 27 सदस्य आणि एका अपक्षाच्या पाठिंब्यासह एकूण 28 सदस्यांचे पाठबळ असल्याने, अध्यक्ष भाजपचाच व्हावा अशी आक्रमक भूमिका आमदार जयकुमार गोरे यांनी घेतली आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (20), शिवसेना (15), काँग्रेस (1) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना (1) असे एकूण 37 सदस्य एकत्र आल्याने या बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाली आहे. भाजपकडून होऊ शकणारा संभाव्य ‘घोडेबाजार’ आणि फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. हे सर्व सदस्य सध्या दक्षिण भारतातील काँग्रेसशासित कर्नाटक आणि केरळच्या सहलीवर असून, म्हैसूर तसेच उटीमध्ये पर्यटनाचा आनंद लुटतानाचे त्यांचे छायाचित्रही समोर आले आहे. या सदस्यांची संपूर्ण बडदास्त ठेवण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांनी आपल्या अत्यंत विश्वासू शिलेदारांवर सोपवली असून, मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांना कोणत्याही प्रलोभनांपासून दूर ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष निवडीसाठी आता अवघे 10 दिवस शिल्लक असल्याने राजकीय हालचालींनी उच्चांक गाठला आहे. निवडणुकीच्या दिवशी सर्वच पक्षांकडून आपापल्या सदस्यांना ‘व्हीप’ बजावला जाणार असला तरी, मतदान गुप्त पद्धतीने होणार की हात उंचावून, या तांत्रिक बाबीवर सत्तेचे भवितव्य अवलंबून असेल. दरम्यान, 20 मार्चच्या या मुख्य लढतीपूर्वी 16 मार्च रोजी जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. या ‘मिनी’ निवडणुकीत होणाऱ्या राजकीय उलथापालथींमधून जिल्हा परिषदेच्या सत्तेचे चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



