
सीआरपीएफ जवान दयालराव रामचंद्र क्षीरसागर (वय 47 वर्षे) यांचा 20 ऑगस्ट रोजी बटालियनमधून घरी जात असतांना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. दौडीपार मार्गावर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.
.
सीआरपीएफ जवान सुट्टी घालवण्यासाठी भंडाऱ्यातील शहापूर या त्यांच्या मूळ गावी जात होते. घरी जात असतांना भंडारा-पवनी मार्गावरील दौडीपारच्या जंगल परिसरात अचानक एक चितळा रस्ता ओलांडत असतांना जवानाच्या गाडीला धडकला. या धडकेत जवानाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते थेट खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर रुग्णालयात नेत असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.
जवान दयालराव यांच्या पार्थिवावर दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 01.30 वाजता शासकीय इतमामात शहापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला 192 BN CRPF चे डेप्युटी कमांडंट अवस्थी साहेब, तसेच जवाहरनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भीमाजी पाटील उपस्थित होते. CRPF कडून 2–6 ची विशेष तुकडी हजर राहून दिवंगत ASI क्षीरसागर यांना मानवंदना देण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिस दलाकडून सुद्धा सशस्त्र सलामी देण्यात आली असून 3–3 गोळ्यांच्या फैरी झाडून शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार पार पडले.
सीआरपीएफ जवानावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अग्निदहन करण्यापूर्वी दिवंगतांचे पार्थिव राष्ट्रीय ध्वजाने आच्छादित करण्यात आले होते. हा राष्ट्रीय ध्वज दिवंगतांच्या पत्नींच्या स्वाधीन करण्यात आला, त्यावेळी संपूर्ण परिसर भावविभोर झाला होता. तसेच, दिवंगत ASI क्षीरसागर यांच्या दोन्ही कन्यांनी आपल्या वडिलांना सॅल्यूट देत अखेरचा निरोप दिला.
या प्रसंगी हजारो नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्व सैनिक बहुउद्देशीय संस्थाकडून संस्थेचे अध्यक्ष सुबेदार मेजर रामचंद्र कारेमोरे साहेब यांनी दिवंगत ASI क्षीरसागर यांना पुष्पचक्र अर्पण केले.
मानवंदना परेडचे संचालन संस्थेचे सचिव हवालदार अनिल भोंगाडे यांनी केले, तर संपूर्ण संचलन गोपिवाडा कमांडो ग्रुपचे संचालक कमांडो चंद्रशेखर डोलस यांनी पार पाडले.
यावेळी संस्थेचे अनेक सदस्य व नागरिक उपस्थित राहून दिवंगत ASI क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.