
Maharashtra St Mahamandal: उन्हाळी सुट्टीत गावाला जायचा प्लान आखताय तर एसटी महामंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुट्टीच्या हंगामात मुंबई आणि उपनगरातून गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. नियमित गाड्यांबरोबर 19 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमुळं मुंबई आणि उपनगरामधून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळं महामंडळाने मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, उरण आणि पनवेल या आगारातून जादा एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या आगारातून दररोज 239 फेऱ्या सोडण्यात येणार असून आता याची संख्या 255 इतकी झाली आहे. परळ आणि कुर्ला एसटी स्थानकातून सर्वाधिक गाड्या सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एक दिलासा दिला आहे. एसटी महामंडळाच्या साध्या बसने प्रवास करताना त्यात बिघाड झाल्यास एसटीच्या एसी बसनेदेखील त्याच तिकीटावर प्रवास करता येणार आहे. त्यामुळं एसटीने प्रवास करताना बसमध्ये बिघाड झाल्यास प्रवाशांना दुसऱ्या बसची वाट बघत तासनतास रस्त्यावर उभे राहावे लागणार नाही.
एसटीसाठी बुकिंग कसे कराल?
महामंडळाच्या राज्यभरातील आगारांतून सुटणाऱ्या जादा फेऱ्यांद्वारे एसटी बस दररोज 521 मार्गावर धावणार आहे. या गाड्यांचे बुकिंग महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे करता येणार आहे. याशिवाय, राज्यभरातील बसस्थानकावरील आरक्षण केंद्रावरही बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
एसटीचे लोकेशन समजणार
प्रवाशांना अॅपमधील ‘ट्रॅक बस’ या सुविधेत तिकीटावरील ट्रिप कोड टाकल्यावर बसचे लाइव्ह लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्यांचे थांबे हेदेखील समजणार आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून, त्याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसंच, एसटी बिघडली किंवा अपघात झाल्यास या अॅपमधून यंत्रणांना फोन करण्याची सुविधाही देण्यात आलीय. गाडीचा चालक व वाहक यांचीही माहिती त्यामध्ये उपलब्ध करण्यात येणार असून, एखाद्या मार्गावर किती बस, कोठे आहेत आणि स्थानकावर पोचण्यास किती वेळ लागू शकतो, आदी माहितीही प्रवाशांना या ॲपमध्ये पाहता येणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.