
Maharashtra State Big Decision About DCM Sunetra Pawar: राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्त्यारित येणाऱ्या गृहविभागाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसंदर्भात हा निर्णय घेतला आहे. खासदार असताना सुनेत्रा पवारांना देण्यात आलेल्या ‘एक्स’ दर्जाच्या सुरक्षेऐवजी आता त्यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. सुनेत्रा पवार या आता राज्याच्या उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सुनेत्रा पवारांकडे तीन खाती आणि दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद
अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये अकाली निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना शनिवार, 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं वगळता सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य सरकारमधील तीन खातीही सोपविण्यात आली आहेत. तसेच मंत्रालयात अजित पवार यांच्या वापरातील दालनेही सुनेत्रा पवारांच्या कार्यालयासाठी मंगळवारी प्रदान करण्यात आली. राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये समावेश होणाऱ्या पुणे आणि बीडचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर एवढी जबाबदारी सोपवण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचा आढावा राज्य सरकारकडून घेण्यात आला. यानंतरच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुनेत्रा पवार यांना यापुढे ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. त्याविषयीच्या सूचना गृहविभागाला देण्यात आल्या आहेत. सुनेत्रा पवार या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यात पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एक्स आणि झेड प्लस सुरक्षेमध्ये फरक काय?
एक्स दर्जाची सुरक्षा ही कमी धोका असलेल्या नेत्यांना असते. यामध्ये या नेत्यांसोबत 2 सशस्त्र पोलिस असतात मात्र कमांडो असत नाहीत. तर दुसरीकडे झेड प्लस सुरक्षेमध्ये तब्बल 36 ते 55 जणांचा सुरक्षा ताफा 24 तास सोबत असतो. उच्च स्तरावरील धोका असलेल्या नेत्यांना ही सुरक्षा दिली जाते. या सुरक्षा कड्यामध्ये एनएसजी/सीआरपीएफ कमांडोबरोबरच बुलेटप्रूफ वाहने पुरवली जातात.
सुरक्षेचे कोणकोणते प्रकार आहेत?
भारतात व्हीआयपी (VIP) आणि व्हीव्हीआयपी (VVIP) व्यक्तींसाठी सुरक्षा व्यवस्था वेगवेगळ्या श्रेणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या श्रेण्या धोक्याच्या पातळीवर निश्चित करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कोणाला कोणती सुरक्षा द्यायची हे ठरवलं जातं. सुरक्षेच्या मुख्य श्रेण्यांमध्ये एक्स, व्हाय, व्हाय प्लस, झेड, झेड प्लसबरोबरच एसपीजी (स्पेशल कमांडो ग्रुप) सुरक्षेचा समावेश आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



