
उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादन करणाऱ्या सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनोहर खिल्लारी व त्याच्या पत्नीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २७ रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांच्यावर सन २०११ मघ्ये लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठ कार्यालयास परवानगी मागितली होती. वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीनंतर उप अधिक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने अधिक चौकशी सुरू केली होती.
यामध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी खिल्लारी यांचे ता. १ जानेवारी २००५ ते ता. १५ मार्च २०२२ या कालावधीतील एकूण उत्पन्न १.४३ कोटी रुपये आहे. मात्र, परीक्षण कालावधीत त्यांचे एकूण उत्पन्न १.८७ कोटी रुपये दिसून आले आहे. त्यामुळे एकूण उत्पन्न व परीक्षण कालावधीत दाखविण्यात आलेल्या उत्पन्नामध्ये ४४ लाख रुपयांचे वाढीव उत्पन्न दिसून आले. या प्रकरणात त्यांना वाढीव उत्पन्नाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देता आली नाही.
या प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी तथा सध्या सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर खिल्लारी व त्यांच्या पत्नी रेखा खिल्लारी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादित केल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनोहर खिल्लारी व त्यांची पत्नी रेखा खिल्लारी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपतचे उप अधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू पुढील तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



