
Sanjay Raut on Alliance with BJP in Chandrapur: चंद्रपूर महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाशी युती केली असून दोन्ही पक्षांचा महापौर आणि उपमहापौर बसले आहेत. दरम्यान राज्यात एकमेकांचे कट्टर शत्रू असणारे भाजपा-शिवसेना चंद्रपुरात मांडीला मांडी लावून बसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्या नगरसेवकांवर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला जात असताना संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“चंद्रपूरच्या नगरसेवकांना मी कालही सांगितलं आहे. काँग्रेस पक्षाने अधिक गंभीरपणे शिवसेनेच्या नगरसेवकांशी चर्चा करण्याची गरज होती. त्यात वंचितचेही लोक होते. पण दुर्देवाने तिथे काँग्रेसचे दोन गट असून, त्यांच्यात शेवटपर्यंत एकवाक्यता झाली नाही. आम्ही त्यासंदर्भात वरिष्ठांशी बोललो. खासदार धानोकर, विजय वडेट्टीवार यांच्याशीही बोलणं झालं. दोघांमध्येही एकमत होत नव्हतं. अशावेळी स्थानिक राजकारणात उलथापालथ झाली आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. यात स्वत: उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत. कदाचित दोन तीन दिवसात त्यांना मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतर पुढील माहिती देईन,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत करण्याची भूमिका नव्हती आणि आजही नाही. ज्या भाजपाने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरण्यास मदत केली अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होते. याउपर कोणी सूपर उद्धव ठाकरे झाले असतील तर माहिती नाही”.
ते सुपर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई आहेत का? यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. ते म्हणाले “जसं बाळासाहेब ठाकरे एक आहेत तसंच उद्धव ठाकरे एकच आहेत. मी उद्धव ठाकरेंचे आदेश मानतो. कितीही मोठा झालो आणि मनाला पटली नाही जेव्हा माझे पक्षप्रमुख संजय हे करायचं आहे सांगतात तेव्हा अजिबात वाद घालत नाही. त्यांचा आदेश पाळतो. सत्ता किंवा पदं त्यापुढं काही नाही. अनेकांनी ही शिस्त पाळली आहे. सत्ता कोणाला विचारांपेक्षा मोठी वाटत असेल तर मी त्यांना हात जोडतो”.
“वरुण सरदेसाईंवरील कारवाईसंदर्भात आपण सांगू शकत नाही. कोणीतरी तिथून सांगत आहे. अनेकदा अशा चर्चा आमच्याशी होत असतात. पण उद्धव ठाकरेंचा निरोप आम्ही सांगतो. भाजपासोबत जाणं पाप आहे आणि हा महाराष्ट्राला न पटणारा विचार आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, ती उद्या राहण्याची शक्यता नाही. पण शिवसेना हा डाग लावू इच्छित नाही. गेली अनेक वर्षं आम्ही त्यांच्याशी संघर्ष करत असताना, आता सत्तेसाठी तडजोड करणं माझ्यासारख्याला न पटणारी आहे,” असंही ते म्हणाले.
“पक्षातील बहुसंख्य लोक या विचाराशी मान्य नाहीत. चंद्रपुरात युती करायची असेल तर शिवसेनेतून बेईमानी करुन आलेल्या गद्दारांना बाहेर काढा,” असंही त्यांनी सांगितलं.
शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या दोन गटात एकवाक्यता झाली नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची जबाबदारी जास्त होती. उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला हवी होती. तुम्ही आत्मचिंतन करावं असा सल्लाही त्यांनी दिला.
चंद्रपुरात पाठिंबा काढून घेण्याबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतली. कल्याण डोंबिवलीत जे मनसेसोबत झालं ते चंद्रपुरात आमच्यासोबत झालं असही ते अखेरीस म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



