
Jitendra Awhad vs Gopichand Padalkar Clash : आमदार रोहित पवारांचा पोलिसांना दमबाजी करतानाचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. मध्यरात्रीच्या नाट्यानंतर कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथं पोलिसांशी त्यांचा वाद झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत असून, रोहित पवार यांनी संतप्त स्वरात थेट पोलिसांनाच दमदाटी केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यादरम्यान त्यांच्यासोबतचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
गुरुवारी विधीमंडळाच्या लॉबीमध्ये दोन गटांमध्ये राडा झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याचदरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे, ‘हातवारे करायचे नाहीत सांगतोय तुम्हाला. शहाणपणा करु नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही….’ असं रोहित पवार पोलिसांवर संतापून म्हणताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
दरम्यान, सदर प्रकरणी माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी घडल्या प्रकाराची माहिती देत म्हटलं, ‘आम्ही आझाद मैदान पोलीस स्थानकात गेलो होतो. तिथं जे एपीआय होते त्यांना नेमकं काय चाललंय कळत नव्हतं. ते झोपेत होते की वेगळं काही हे मला सांगता नाही येणार. नितीन देशमुख कुठे आहेत हे आम्ही विचारलं, तर काय, कुठं… माहिती नाही म्हणाले.’
आपल्याला सीपींनी देशमुख कुठं असल्याचं सांगितलं आणि आम्ही तिथं गेलो असं सांगत तिथं एपीआयकडून हातवारे करत ऐकाsss असं काहीतरी वक्तव्य करण्यात आल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. यावरूनच त्यांचा संताप झाला, जर लोकप्रतिनिधींशी पोलीस असं वागणार असतील तर गरिब जनतेला ताटकळतच ठेवत असतील असं ते म्हणाले. आमदार असताना तुम्ही आमदाराशी नीट बोलत नाही उद्या गरिबाला कशी वागणूक देतील हे? असा प्रश्न उपस्थित करत तुमचं वागणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलं. रात्री दोन वाजता अॅडिशनल सीपींना कोणाचा फोन येतो? असं म्हणत पोलिसांकडून मिळालेली वागणूक पाहता रोहित पवार यांनी तीव्र स्वरात नाराजी व्यक्त केली.
नेमकं काय प्रकरण?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी SP चे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये महाराष्ट्र विधानभवनाबाहेर झालेल्या संघर्षाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी-एससीपी आमदार रोहित पवार यांचे समर्थक मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनबाहेर निदर्शनं करताना दिसले. विधानभवनच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जाताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांचं वाहन अडवलं. तिथं जीपसमोरच ठिय्या धरला, यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली. तर मारहाण करणाऱ्या 5 जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात असल्याचा मुद्दा समोर आला. त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही त्यावर प्रतिक्रिया उमटल्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.