
M K Stalin: तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळगम (DMK) चे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी महाराष्ट्रातील हिंदीसक्ती विरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विशेष कौतुक केले. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी एकत्र येत ठाकरे बंधुंनी विजयी मेळावा साजरा केला. यासंदर्भात स्टॅलिन यांनी ट्विटरवर पोस्ट करत त्यांचे कौतुक केले.
तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील जनता हिंदीसक्ती विरोधात पीढ्यानपिढ्या लढत आली आहे, असे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली. केंद्र सरकार तमिळनाडूतील शाळांमध्ये तिसऱ्या भाषा म्हणून हिंदी सक्तीची करतेय. अन्यथा निधी रोखण्याचा प्रयत्न करतेय. पण महाराष्ट्रातील जनआंदोलनापुढे तिथल्या सरकारला माघार घ्यावी लागली. उद्धव आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत झालेल्या सोहळ्याची त्यांनी प्रशंसा केली. तसेच राज ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्नही त्यांनी अधोरेखित केले. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा काय आहे? तसेच हिंदी बोलणारी राज्ये मागास असताना प्रगत राज्यांवर हिंदी का लादली जात आहे? असे प्रश्न विचारत त्यांनी केंद्र सरकारला थेट आव्हान दिले. हिंदी-संस्कृत लादण्याच्या नवीन शिक्षण धोरणाला तमिळनाडू कधीच स्वीकारणार नाही. तमिळनाडूला शैक्षणिक निधी म्हणून 2152 कोटी रोखण्याच्या केंद्राच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
हा तमिळ भाषा आणि संस्कृतीवरचा हल्ला आहे. ही लढाई फक्त भावनिक नाही तर बौद्धिक आणि तर्कसंगत आहे, जी भारताच्या बहुभाषिक संस्कृतीचा बचाव करते. तसेच महाराष्ट्रातील जनजागृतीमुळे हिंदीसक्ती करणाऱ्यांच्या डोळ्यावरचा पडदा दूर होईल, असेही त्यांनी नमूद केले.स्टॅलिन यांनी तमिळनाडूतील कीझाडी नागरी संस्कृतीला मान्यता देण्यास केंद्राचा नकार आणि निधीतील भेदभाव यांच्यावरही टीका केली. जर भाजपने तमिळनावर होणरा अन्याय थांबवला नाही, तर तमिळनाडू पुन्हा एकदा भाजप आणि त्याच्या नवीन मित्रांना कठोर धडा शिकवेल, असे ते म्हणाले.
हिंदीसक्तीला द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूचे लोक पिढ्यानपिढ्या विरोध करत आले आहेत. पण हे भाषेच्या हक्कांचे युद्ध राज्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात संघर्षाच्या वावटळीसारखे सुरू आहे. तामिळनाडूच्या शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवले तरच निधी दिला जाईल असे सांगून बेकायदेशीर आणि अराजकतेने वागणारा भाजप दुसऱ्यांदा मागे हटला आहे. कारण जिथे ते सरकारमध्ये आहेत त्या महाराष्ट्रातच लोकांचा उठाव झाला.
उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवली जाते? असा प्रश्न स्टॅलिन यांनी विचारला. हिंदी भाषिक राज्ये मागास आहेत आणि हिंदी न बोलणाऱ्या प्रगत राज्यांमधील लोकांवर तुम्ही हिंदी का लादत आहात? असा प्रश्न त्यांनी विचारला. हिंदी आणि संस्कृतच्या विकासाला पूर्णवेळ प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे राजठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, असेही ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.