
हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये पावसाने हाहाकार उडवला असून 30 पैकी तब्बल 22 मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील तीन ठिकाणी पूल नादुरुस्त झाल्याने रस्ते बंद झाले असून कळमनुरी ते पुसद व
.
हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. विशेषतः कळमनुरी तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. या पावसामुळे नदी व नाल्यांना पूर आल्यामुळे पुराचे पाणी शेतामध्ये शिरले आहे. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पुरामुळे जमीन खरडून गेल्या आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ ते दरेगाव, असोला ते बर्गेवाडी, रांजाळा ते वडद या मार्गावरील पूल नादुरुस्त झाले आहेत त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. याशिवाय शेवाळा ते हदगाव या मार्गावर कयाधू नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे हा रस्ता देखील बंद झाला आहे.
दरम्यान कळमनुरी व वाकोडी मंडळामध्ये सर्वात जास्त 122 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय नांदापूर मंडळात 113 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तसेच हिंगोली 77, नरसी 68, सिरसम 66.3, बासंबा 72, दिग्रस 76, माळहिवरा 66, खांबाळा 66, बाळापूर 91, वारंगा 109, वसमत 78, आंबा 78, हयातनगर 78, हट्टा 69, टेंभुर्णी 78, कुरुंदा 78, औंढा 85, येहळेगाव 113, साळणा 85, जवळा बाजार मंडळात 85 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान धरणामध्ये पाण्याची आवक लक्षात घेता ईसापुर धरणाचे सात दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले असून सहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे या 13 दरवाजामधून 54466 क्युसेक पाण्याचा पैनगंगा नदीमध्ये विसर्ग केला जात आहे.

याशिवाय सिद्धेश्वर धरणही 99 टक्के भरले असून धरणाचे आठ दरवाजे तीस सेंटिमीटर उघडण्यात आले आहेत या धरणातून सहा हजार 579 क्युसेक पाण्याचा पूर्ण नदीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे. धरणामध्ये पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथील विठ्ठल कदम यांच्या घराचे नुकसान झाले आहे. तसेच कुंडकर पिंपरी येथील शिवाजी कान्हे यांच्या मालकीची एक म्हैस दगावली आहे.
जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तालुका प्रशासनाला दिल्या आहेत. याशिवाय पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या ठिकाणी गावकऱ्यांचे स्थलांतर करावे अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. नागरिकांनीही पुलावरून पाणी जात असताना पूल ओलांडण्याचा धोका पत्करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी गुप्त यांनी केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.