
हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त शाळा व महाविद्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज सिंग यांनी गुरू तेग बहादुर यांच्या जीवनावर आधारित गायलेले गीत आज कोकण विभागातील 20 हजार शैक्षणिक संस्थामध्ये 51 लाख विद्यार्थी आणि 1.5 लाख शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या सहभागातून समुहगान गायीले आहे. या उपक्रमाची बेस्ट ऑफ इंडिया रिकॉर्ड संस्थेकडून वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नोंद घेण्यात आली असल्याची माहिती राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. या उपक्रमात मुंबईतील सर्व महानगरपालिका प्राथमिक, माध्यमिक, खाजगी अनुदानित, विना अनुदानित व अन्य मंडळांच्या एकूण दोन हजार 321 शाळांमध्ये सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. श्री गुरू तेग बहादुर यांच्या शौर्याचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी शिक्षण संस्था, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहेत. नवी मुंबई येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी या माध्यमातून केले आहे. नवी मुंबई येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी, आरोग्य शिबीर तसेच समुहगान असे उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले प्रेरणादायी गीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या सहभागातून सामूहिकरित्या गायन करण्यात आले. समूहगानातून गुरु तेग बहादूर यांच्या बलिदान व मानवतेच्या मूल्यांची आठवण उपस्थितांना करून देण्यात आली. विद्यार्थ्यांना या निमित्ताने सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबादारीची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येते. तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये “हिंद दी चादर”गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त समूहगान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी वर्गाने विविध शाळांना भेट देऊन या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला व विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांनी या उपक्रमात उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते. त्यांचा पराक्रम, वीरता, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आहे. त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा, यासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासन करीत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



