
Maharahtra Rain News: राज्यभरात पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आता राज्यभरात पुन्हा एकदा पावसानं थैमान घातलं आहे. पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं असून त्यामुळे घरात ना खायला उरलं, ना शेतात पुन्हा पेरायला. पावसाच्या हाहाकारानं होत्याचं नव्हतं झालं आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पाहूयात सविस्तर
बा परमेश्वरा, पांडुरंगा बस कर आता.. बळीराजा खचलाय. किती परीक्षा बघशील त्याची. त्यांच्या हातात जे होतं त्याचं नव्हतं झालं. स्वप्नाचा चिखल झाला. संसार उघड्यावर आला. पुराचं पाणी ओसरलं आणि आता पुन्हा भरलं. हे भरलेलं पाणी पुन्हा ओसरलं. मात्र, तुझ्या या माऱ्यामुळे त्यांच्या डोळ्यातला हा अश्रूचा महापूर आयुष्यभर तसाच राहिल. नेतेमंडळी बांधवार पोहोचले मदतीचं आश्वासन दिलं, पाठीवर हात ठेऊन धीर दिला. मात्र, त्यांना गरज आहे आता तुझ्या आधाराची.
शिकवायचं आणि जगायचं कसं?
मुलगा शिकून मोठा होईल, नोकरीला लागेल, पाचवीला पूजलेलं दारिद्र कायमचं दूर जाईल.. पण या पुरात त्याच्या वह्या पुस्तकं, पेन, पाटी, पेन्सिल सर्व काही नष्ट झालं आणि यासोबत त्याची स्वप्नही वाहून गेली. त्यामुळे शिकवायचं कसं? जगायचं कसं? असे असंख्य स्वप्न शेतकऱ्यांकडे पुढे आ वासून उभे आहेत.
या वर्षी तुझी कृपा होईल म्हणून त्यानं सावकार आणि बँकेच्या पायऱ्या झिजवून कर्ज घेतलं, तुझ्या भरवशावर पैसा मातीत पेरला, चांगलं उत्पन्न मिळेल दिवाळी, दसरा गोड होईल, मुलांना दोन जोडी कपडे होतील. डोक्यावरचे दोन पैसे फेडून पोरांची लग्न करता येईल अशी स्वप्न त्यानं बघितली होती. मात्र, आता लग्न दूरच राहिलं. बँक आणि सावकाराच्या जाचात तो सापडला आहे. त्यांच्या रोजच्या तगाद्यापुढेही त्यानं हार मानली आहे. त्यामुळे घरात असणारी दोर कधी त्याच्या गळ्याला लागली तेही त्याला कळलं नाही.
पुन्हा सांगतोय परमेश्वरा बस कर आता. सुखानं दोन घास खाऊ दे. मोकळा श्वास घेऊ दे. शेतकऱ्याची उरली-सुरली आशाही हिरावून घेऊ नको. आता तुच त्यांना हिंमत दे. पुन्हा लढण्याची उमेद दे. दयेचा पाझर फोड आणि त्यांच्या घामाला मोल दे.
FAQ
राज्यातील पावसाची सध्याची स्थिती काय?
२७ ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान मराठवाडा, सोलापूर आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. माढा तालुक्यातील उंदरगाव आणि केवडमध्ये सीना नदीला पूर आला असून, घरांमध्ये पाणी शिरले आहे.
पावसामुळे झालेले नुकसान काय?
शेतकऱ्यांच्या शेतीत पिके (जसे सोयाबीन) पूर्णपणे नष्ट झाली. घरातील संसारोपयोगी वस्तू, पशुधन आणि हजारो हेक्टर शेती खराब झाली. सोलापूरसह २९ जिल्ह्यांत अतिवृष्टीची भरपाई जाहीर झाली.
शेतकऱ्यांची मुख्य समस्या काय?
पिकांचे नुकसान झाल्याने उत्पन्नाचे स्रोत गेले. बँक आणि सावकाराचे कर्ज फेडता येत नाही, ज्यामुळे आर्थिक संकट आणि आत्महत्येचा धोका वाढला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.