
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर खुद्द संजय राऊत यांनीच या मौनाला पूर्णविराम दिला आहे. “मला पोटाचा कॅन्सर झाला होता,” असा धक्कादायक पण तितकाच धाडसी उलगडा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या वैयक्तिक लढाईतून ते आता यशस्वीपणे बाहेर पडत असून, त्यांनी पुन्हा एकदा राजकीय मैदानात पूर्ण ताकदीने एन्ट्री केली आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत संजय राऊत यांनी त्यांच्या आजारपणाचा सविस्तर प्रवास मांडला. ते म्हणाले, “गेल्या वर्षी दिवाळीच्या दोन-चार दिवस आधी मला कॅन्सरचे निदान झाले. माझे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी माझे रक्त तपासले होते, त्यातून हे निष्पन्न झाले की मला पोटात कॅन्सर आहे. हे निदान झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र मी खचलो नाही.” शस्त्रक्रिया आणि उपचार सुरू संजय राऊत यांच्यावर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून ते काही दिवस रुग्णालयातही उपचार घेत होते. मध्यंतरी त्यांचा मास्क लावलेला फोटो समोर आल्याने समर्थकांमध्ये धाकधूक वाढली होती. त्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “काही सर्जरी झाल्या आहेत आणि काही अजून बाकी आहेत. त्या होतीलच. आपण राजकारणात अनेकांच्या ‘सर्जरी’ करतो, ही तर आपल्या शरीरातील सर्जरी आहे. मी त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा जेव्हा शक्य झाले, तेव्हा मी लोकांसमोर उभा राहिलो आहे.” स्वपक्षीयांसह विरोधकांकडूनही विचारपूस संजय राऊत यांच्या आजारपणाची बातमी समजताच महाराष्ट्रातील राजकीय कटुता बाजूला ठेवून अनेक बड्या नेत्यांनी त्यांची विचारपूस केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जुन्या मैत्रीच्या नात्याने राऊतांच्या आरोग्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सतत त्यांच्या संपर्कात होते. लढवय्या वृत्तीचे दर्शन कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे निदान होऊनही संजय राऊत यांनी आपली लेखणी थांबवली नाही. आजाराच्या काळातही त्यांनी ‘सामना’तून आपली भूमिका मांडणे सुरूच ठेवले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



