
फुलंब्री तालुक्यातील आर्थिक बाबीचा कणा असलेला देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा १४ वर्षांचा वनवास संपला असून गुरुवारी या कारखान्याचे बॉयलर पेटले असून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारखान्याचे प्रशासकीय चेअरमन कल्याण चव्हाण व त्यांच्या पत्नीच्या हस्ते विधिवत पूजा करून कारखान्याचे बॉयलर पेटवण्यात आले. या वेळी फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधा चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता अतुल चव्हाण, प्रशासकीय संचालक नितीन देशमुख, योगेश मिसाळ, फुलंब्री नगरसेवक वाल्मीक जाधव, माजी नगरसेवक गजानन नागरे, बाबासाहेब सिंगारे यांची उपस्थिती होती. देवगिरी सहकारी साखर कारखाना १९९२-९३ साली सुरू करण्यात आला होता. या कारखान्याचे कार्यक्षेत्र फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर या दोन तालुक्यांत आहे. कारखाना सुरू होण्याची १८ हजार शेतकरी सभासद वाट बघत होते. आमदार अनुराधा चव्हाण यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा कारखाना सुरू करणार असे आश्वासन दिले होते. हा कारखाना सुरू झाला असून त्यांनी दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती केली आहे. २० दिवसांत या कारखान्यातून साखर निघणार असल्याचे प्रशासकीय चेअरमन कल्याण चव्हाण यांनी सांगितले. सुचित बोरसे, नरेंद्र देशमुख, निखिल चव्हाण, संतोष तांदळे, सांडू जाधव, योगेश्वर जाधव, विलास जाधव, लक्ष्मण मते, मच्छिंद्र चव्हाण, योगेश जाधव उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



