
Amol Mitkari on NCP Alliance: विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धूरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांना समर्पीत करण्यात आलेल्या मासिकाच्या अध्यक्षीय लेखात हा दावा केला आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी आम्ही अद्याप अजित पवार जाण्याच्या धक्क्यातून सावरलेलो नाही सांगत अमोल कोल्हेंनीच ही चर्चा सुरु केल्याचा दावा केला.
“सुनील तटकरेंनी यावर स्षष्टीकरण दिलं आहे. विलिनीकरणाची चर्चा आमच्या पक्ष पातळीवर सध्या तरी नाही. 15 दिवसांपूर्वी बारामतीत अजित पवारांवर अंत्यविधी झाल्यानंतर विलिनीकरणावर पहिली प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली होती. त्यानंतर हा विषय सुरु झाला. अंकुश काकडे यांनी 12 ताऱखेचा दावा केला होता. या त्या गटाने दिलेल्या माहिती आहेत. पण वरिष्ठ पातळीवरील बैठकीत किंवा आमच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही अद्याप अजित पवार जाण्याच्या धक्क्यातून सावरलेलो नाही. अमोल कोल्हे यांनीच ही चर्चा सुरु केली,” असं त्यांनी म्हटलं आहे.
“पवार कुटुंब हे राजकारण आणि कौटुंबिक बांधिलकी वेगळं ठेवतं. जय पवार यांच्या लग्नात युगेंद्र पवार, रोहित पवार होते. शरद पवार प्रकृतीच्या कारणास्तव परदेशात गेले नव्हते. पण त्याचे वेगळे अर्थ लावले गेले. सुप्रिया सुळेंनीही त्यांच्या मुलीचं लग्न अजित पवारांच्यासमोर ठरल्याचं सांगितलं. परिवार आणि राजकारण हे वेगळं आहे. राजकारणात वेगळे असले तरी कौटुंबिकपणे एकत्र आहेत. हा महाराष्ट्रासमोर वेगळा आदर्श आहे,” असंही त्यांनी सांगितलं. विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर निर्णय घेतील. त्या निर्णयाला आम्ही एकमताने पाठिंबा देऊ असं त्यांनी सांगितलं.
लेखात काय लिहिलं आहे?
“12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्याचा निर्णय माननीय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता, विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्त करण्याचा निर्णयही साहेबांसह सर्व नेत्यांनी केला होता. कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा व अपेक्षा होती. त्यासाठी ते आग्रही होते. पण मध्येच काळाने झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचे स्वप्न अपुरे राहिले. आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले मन मोठे करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रवादीचे विलीनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
“अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्यानाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. परंतु झालेली चुक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचाराने दादा मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण करायचे असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. जयंत पाटील, मा. पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते. महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली होती आणि स्वतः हिरीरीने प्रचाराची आघाडी सांभाळीत होते,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



