
Maharashtra Local Body Election: महाराष्ट्रामध्ये मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वात महत्त्वाच्या निवडणुका मानल्या जाणाऱ्या महापालिका निवडणूक कधी जाहीर होणार याबद्दलची माहिती समोर आली आहे. महापालिकांची निवडणूक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांची ऑनलाइन बैठक घेतली. बहुतेक आयुक्तांनी या बैठकीदरम्यान निवडणुकीसाठी आमची तयारी असल्याचे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बैठकीत काय झालं?
राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी या बैठकीत मतदार याद्या अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्याबाबत आयुक्तांना विचारणा केली. आयोगाने या याद्या 10 डिसेंबरला प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यासाठी आणखी दोन-तीन दिवस लागू शकतात, असे काही आयुक्तांनी सांगितले. तसा अवधी देण्याची तयारी आयोगाने दर्शविली असून आता आयोग 8 डिसेंबरला पुन्हा आयुक्तांची बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा घेणार आहे.
कधी जाहीर होणार महापालिका निवडणूक?
दुसऱ्या आढावा बैठकीमध्ये निवडणुकांसाठी आवशक्य असलेलं मनुष्यबळ म्हणजेच कर्मचारी संख्या व इतर व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल. साधारणतः डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. असं झालं तर 31 जानेवारी 2026 पूर्वी महापालिका निवडणुकीचे निकालही जाहीर होतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
मतदार याद्यांसंदर्भात विशेष निर्देश
महापालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी. प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती आणि सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. याशिवाय प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निर्दशनास आल्यास तक्रारींची वाट न पाहता स्वतःहून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश वाघमारे यांनी आयुक्तांना दिले.
दुबारांची यादी प्रसिद्ध करा
संबंधित महापालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर दुबार मतदारांची यादी प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत आवाहन करावे. आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
हमीपत्र लिहून घ्या
संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल.
किती महापालिकांची निवडणूक होणार?
महाराष्ट्रातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात होणार आहेत. ही निवडणुका दोन ते चार वर्षांपासून प्रलंबित होत्या आणि सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हीच तारीख निवडणुका घेऊन निकाल लावण्याची डेडलाईन आहे. आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यांमुळे काही विलंब झाला असला तरी, डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये ही निवडणुका अपेक्षित आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



