
5 July Morcha Politics: ‘मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे,’ असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेनं (ठाकरे) मुंबईत हाक दिलेल्या मोर्चाबद्दल पत्रकारांशी संवाद साधताना केलं आहे. हिंदीसक्ती विरोधात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईत 5 तारखेला मोर्चाचे नियोजन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिंदीसंदर्भातील विषयावर चर्चा होऊन मोठा निर्णय घेतला जाईल असं सूचकपद्धतीने सांगितलं आहे. असं असतानाच आता खरोखरच सरकारने हा निर्णय मागे घेतला किंवा काही मोठा बदल केला तर 5 जुलैचा नियोजित मोर्चा होणार की नाही याबद्दल संभ्रम असतानाच मनसेकडून यावरुन प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.
…म्हणून मनसेनं लावले भाजपा नेत्याचे बॅनर्स
मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी मोर्चाच्या तयारीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “राज ठाकरे गेले दोन अडीच महिने मराठी च्या बाबतीत किंवा हिंदी सक्तीच्या विरोधात मांडलेली आहे. त्याला सकारात्मक आणि पोषक अशा सगळ्यांच्या प्रतिक्रियांचे बॅनर्स आम्ही जागोजागी लावले आहेत. नागरिकांना मराठीसंदर्भातील मान्यवरांचं म्हणणं काय आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे त्या कळाव्यात या उद्देशाने त्यांचे बॅनर लावलेले आहेत. तसेच आदिवासी मंत्री आहेत ते असतील भाजपचे पण त्यांनी देखील हेच सांगितले की, मला मराठीशिवाय दुसरी भाषा, हिंदी येतच नाही. माझ्या आईने मला मराठी शिकवलेली आहे अशा पद्धतीने त्यांची प्रतिक्रिया आहे. त्याचा एकंदर अर्थ हाच होतो की आमच्या भूमिकेला कुठेतरी ते साधर्म असणारी ही प्रतिक्रिया आहे. ते जरी भाजपाचे मंत्री असतील तर त्यांचं अंतर्मन आमच्या भूमिकेशी सहमत आहेत. हेच लोकांना कळू देण्याच्या उद्देशाने आम्ही त्यांच्या विधानाचाही बॅनर लावलेला आहे,” असं किल्लेदार यांनी सांगितलं. असे बॅनर आम्ही रोज जे काही प्रतिष्ठित लोक सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवतील त्यांचा वापर करुन 5 तारखेपर्यंत लावत राहणार आहोत, असंही किल्लेदार म्हणाले.
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय होतं?
“पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही सगळेच घेत आहोत. वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे पदाधिकारी या बैठकांना उपस्थित असतील. काल दक्षिण मुंबईची बैठक झाली. आज दक्षिण मध्य मुंबईची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये कोणत्या सूचना करायच्या, कोणत्या उपाययोजना करायच्या की जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे याबद्दल चर्चा होईल. नागरिकांचा सहभाग या मोर्चामध्ये असला पाहिजे यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, याबद्दलही चर्चा होईल,” असं किल्लेदार म्हणाले.
“लोकांना जाऊन भेटलं पाहिजे. कला, उत्सव मंडळं आहेत. क्रीडा मंडळं आहेत. सांस्कृतिक मंडळं आहेत. शाळा आहेत. शिक्षक, मुख्याध्यापक आहेत. पालक आहेत. तसेच नागरिक देखील आहे. त्यांना जसं घरोघरी जाऊन कसं सांगता येईल? पत्रकं कशी वाटता येतील? या स्वरूपाचे मार्गदर्शन या बैठकीमध्ये केलं जात आहे. येत्या चार दिवसात जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं याचा मार्गदर्शन करून मोर्चा यशस्वी करण्यासाठी तयारी आम्ही करत आहोत,” असं किल्लेदार यांनी स्पष्ट केलं.
सरकारने निर्णय फिरवला तरी मोर्चा काढणार?
अजित पवारांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हिंदीसंदर्भातील निर्णय मागे घेतला तर मोर्चा काढणार का असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना किल्लेदार यांनी, “सरकारने निर्णय मागे घेतला तर मोर्चाच रूपांतर विजयी मोर्चा म्हणून करू,” असं म्हटलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.