
Pune Road With No Pothole In Last 50 Years: पुण्यात एक रस्ता असा आहे जो बांधल्यानंतर आज 50 वर्षांनीही जैसे थे परिस्थितीत आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. बरं हा रस्ता शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक आहे. मग हा रस्ता बांधताना नेमकं असं काय केलं होतं की तो 50 वर्षानंतरही आहे तसाच आहे? या रस्त्याकडे रस्ते बांधणीमधील गुणवत्ता, सचोटी आणि दूरदृष्टी समोर ठेऊन उभारलेला प्रकल्प म्हणून या रस्त्याकडे पाहिलं जातं. हा रस्ता कोणता अन् तो का दर पावसळ्यामध्ये चर्चेचा विषय ठरतो हे पाहूयात….
कोणता आहे हा रस्ता?
ज्या देशात पावसाळ्यात रस्त्यांच्या कामांचा निकृष्ट दर्जा पदोपदी दिसून येत असतो त्याच देशातील पुण्यातील जंगली महाराज रोड हा इतरांहून वेगळा उठून दिसतो. हा रस्ता खड्डे पडणाऱ्या टिपीकल भारतीय रस्त्यांना अपवाद ठरणार आहे. साधारण अर्ध्या शतकापूर्वी बांधलेला हा रस्ता अडीच किलोमीटर लांबीचा असून तो जंगली महाराज मंदिर ते डेक्कन जिमखाना परिसराला जोडतो. हा रस्ता बांधल्यापासून आतापर्यंत त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. स्थानिकांकडून ‘जेएम रोड’ नावाने ओळखला जाणारा हा रस्ता भ्रष्टाचारमुक्त, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिला जातो.
कोणी बांधला आहे हा रस्ता?
जिथे पवलापावलावर खड्डे असतात अशा देशात मागील पाच दशकांपासून एकही खड्डा न पडलेला हा रस्ता अभियांत्रिकी चमत्कार म्हणून पाहिला जातो. या रस्त्याचा इतिहास 1970 पासून सुरु होतो. 1972 मध्ये महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडला. त्यानंतर पुढच्याच वर्षी आलेल्या विनाशकारी पुरामुळे पुण्यातील रस्ते उद्ध्वस्त झाले. त्यावेळी, 21 वर्षीय नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांनी प्रश्न उपस्थित केला की जास्त पाऊस पडणाऱ्या मुंबईमध्ये अशाच रस्त्यांची दुर्दशा का झाली नाही? पुण्यातच असं का घडलं असा प्रश्न त्यांना पडला. पुण्यातील शहर अभियंत्यांनी यासंदर्भात माहिती देताना शिरोळे यांना मुंबईतील पारसी मालक असलेली कंपनी, ‘रेकोंडो’ने प्रगत ‘हॉट मिक्स’ तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईतील रस्ते बांधल्याचं सांगितलं. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे रस्ते जास्त काळ टिकून राहतात. पुण्यातही असेच रस्ते बांधायचं असं मनाशी पक्क ठरवून शिरोळे यांनी स्वतः कंपनीशी संपर्क साधला आणि त्यांच्या मालकांना जंगली महाराज रोडचं कंत्राट स्वीकारण्यास भाग पाडलं.
कंपनीकडून काय लिहून घेण्यात आलेलं?
सामान्य कंत्राट पद्धतीला आव्हान देत या प्रकल्पाचं अंतिम ध्येय समोर असल्याने कोणतीही सार्वजनिक निविदा काढण्यात आली नाही. त्याऐवजी, हे काम थेट ‘रेकोंडो’ला देण्यात आले. मात्र हे कंत्राट देताना कंपनीकडून लेखी हमी घेण्यात आली की रस्ता किमान दहा वर्षे खड्डेमुक्त राहील. या रस्त्याचे, त्यामुळे होणारे शहराचे कोणतेही नुकसान कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दुरुस्त केले जाईल, असंही कंपनीकडून लिहून घेण्यात आलं. 1 जानेवारी 1976 रोजी, जंगली महाराज रोड अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 1985 मध्ये कराराच्या दहा वर्षांच्या कालावधीनंतरही रस्ता जैसे थे स्थितीत होता.
तेव्हा पेट्रोल 80 पैसे प्रति लीटरला होतं
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, आज 50 वर्षांनंतरही, रस्त्याला फक्त किरकोळ देखभालीची आवश्यकता आहे. त्यावेळी 15 लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प – जेव्हा सोने प्रति तोळा 200 रुपये आणि पेट्रोल प्रति लिटर 80 पैसे होते तेव्हाचा आहे यावर आज कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हा रस्ता म्हणजे कार्यक्षमता आणि टिकाऊपणाचे एक अतुलनीय उदाहरण असल्याचं दिसून येतं.
एवढा भारी रस्ता बांधूनही पुन्हा कंत्राट मिळालं नाही
जंगली महाराज रोड इतक्या उत्तम पद्धतीने बांधल्यानंतरही रेकोंडो बंधूंना पुण्यात दुसरा प्रकल्प मिळाला नाही. शिरोळे यांनी भ्रष्टाचाराच्या नको असेल तर रस्त्याच्या टिकाऊ गुणवत्तेला श्रेय द्यायला हवं हे कृतीतून दाखवून दिलं आहे. गेल्या काही वर्षांत, रेकोंडो बंधू वेगळे झाले आणि त्यांची कंपनी, रेकोंडो डेव्हलपर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड आता अस्तित्वात नाही. मात्र जेएम रोड आजही आहे तसाच आहे.
FAQ
1. हा रस्ता कोणता आहे आणि त्याची लांबी किती आहे?
हा रस्ता पुण्यातील जंगली महाराज रोड (जेएम रोड) आहे, जो जंगली महाराज मंदिर ते डेक्कन जिमखाना परिसराला जोडतो. त्याची लांबी 2.5 किलोमीटर आहे.
2. हा रस्ता कोणी बांधला?
हा रस्ता ‘रेकोंडो’ या पारसी मालक असलेल्या कंपनीने बांधला, ज्यांनी प्रगत ‘हॉट मिक्स’ तंत्रज्ञानाचा वापर केला. हे कंत्राट 21 वर्षीय नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्या पुढाकाराने देण्यात आले.
3. रस्ता बांधण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले गेले?
रस्ता बांधण्यासाठी ‘रेकोंडो’ कंपनीने प्रगत ‘हॉट मिक्स’ तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्यामुळे रस्ता टिकाऊ आणि खड्डेमुक्त राहिला.
4. रस्त्याच्या बांधकामासाठी कोणती विशेष हमी घेण्यात आली होती?
रेकोंडो कंपनीकडून लेखी हमी घेण्यात आली की रस्ता किमान 10 वर्षे खड्डेमुक्त राहील, आणि कोणतेही नुकसान झाल्यास ते कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दुरुस्त केले जाईल.
5. हा रस्ता कधी वाहतुकीसाठी खुला झाला?
जंगली महाराज रोड 1 जानेवारी 1976 रोजी अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
6. या रस्त्याच्या बांधकामाची पार्श्वभूमी काय होती?
1972 मध्ये महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ आणि 1973 मध्ये आलेल्या पुरामुळे पुण्यातील रस्ते उद्ध्वस्त झाले. यावेळी श्रीकांत शिरोळे यांनी मुंबईतील टिकाऊ रस्त्यांचा दाखला घेत ‘रेकोंडो’ कंपनीला पुण्यात रस्ता बांधण्यासाठी आणले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.