
Shahapur Crime News: शहापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनीच अल्पवयीन मुलीचाच सौदा केल्याची घटना समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील खैरे गाव हद्दीतील शेणवा येथील आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलीचा सौदा करत तिचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शहापूर तालुक्यातील खैरे गाव हद्दीतील शेणवा येथील आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लग्न लावण्याचा कट श्रमजीवी संघटनेने उधळला असून किन्हवली पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9,10, 11 अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पिडीत अल्पवयीन मुलीचे वडील दत्तात्रेय विठ्ठल वातेस यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने दलाल प्रकाश मुकणे याच्या मध्यस्थीने मुलीचे लग्न जय लक्ष्मण शिर्के, रा. बाबुलवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर याच्याशी ठरवले होते.
या व्यवहारात मुलीच्या बदल्यात पालकांना 5,000 रूपये देण्याचे ठरवून त्यातील ₹10,000 रुपये रक्कम रोख स्वरूपात एक महिन्यापूर्वी देण्यात आली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी जय लक्ष्मण शिर्के आणि त्याचे वडील लक्ष्मण रघुनाथ शिर्के हे उच्चवर्णीय समाजातील असून त्यांनी पिडीत मुलगी ही अल्पवयीन व अनुसूचित जमातीतील असल्याचे माहित असतानाही तिच्या कुटुंबाच्या गरीबीचा गैरफायदा घेत मुलीची विक्री करून विवाह लावून देण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणामुळे आदिवासी कातकरी समाजातील गरीब कुटुंबांना फसवून मुलींची खरेदी-विक्रीसारखी घृणास्पद पद्धत उघड झाली असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विवेक पंडित यांनी शासनाकडे केली आहे. आदिम आदिवासी अल्पवयीन मुलींच्या विक्री करून जबरदस्तीने लग्न लावण्याच्या या प्रथेविरुद्ध श्रमजीवी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, पालघरमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. 50 हजार रुपयांसाठी एका 14 वर्षीय मुलीची आजीनेच विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघरच्या वाडा तालुक्यातील कातकरी जमातीच्या मुलीची तीन वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली होती. सासरच्यांकडून छळ होऊ लागल्याने मुलीकडून वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. वाडा पोलीस ठाण्यात 370 मानवी तस्करी , 420 फसवणूक , सह बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. नवऱ्यासह सासू , एक दलाल आणि आणखीन दोघांविरोधात गुन्हा दाखल . नवरा जीवन गाडे आणि दलाल रवी कोरे यांना वाडा पोलिसांकडून अटक.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.