
अमरावती शहरात महावितरणच्या प्रिपेड वीज मीटर योजनेविरुद्ध मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. विविध पक्ष, संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन ‘वीज ग्राहक जनमोर्चा’ची स्थापना केली असून, येत्या १० मार्च रोजी विद्युत भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
.
संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार कर्मचारी संघटनांसह अनेक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. जनमोर्चाचे पदाधिकारी तुकाराम भस्मे, डी.एस. पवार आणि महेश जाधव यांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटरच्या नावाखाली बसवले जाणारे प्रिपेड मीटर वीज ग्राहक कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. सध्याच्या व्यवस्थेत वापरानंतर बिल भरण्याची आणि वीज खंडित करण्यापूर्वी १५ दिवसांची नोटीस देण्याची तरतूद आहे, मात्र नव्या प्रिपेड मीटरमुळे हे ग्राहक हक्क धोक्यात येणार आहेत.
आंदोलकांच्या मते, प्रिपेड मीटरमुळे आधी पैसे भरा आणि मगच वीज वापरा अशी प्रक्रिया लागू होणार आहे. शिवाय, सर्व व्यवहार मोबाईल आणि बँक खात्यांद्वारे करावे लागणार असल्याने अनेक ग्रामीण आणि गरीब ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. महावितरणने चोरी रोखण्यासाठी हे मीटर बसवत असल्याचा दावा केला असला तरी, जनमोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हा युक्तिवादही फेटाळला आहे. त्यांच्या मते, मीटर हे केवळ वीज मोजण्याचे साधन असून त्यामुळे चोरी थांबणार नाही.
शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा-बैठकांचे आयोजन करण्यात येत असून, १० मार्चच्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. या वेळी जे.एम. कोठारी, अशोक सोनारकर, गणेश मुंदरे, सुनील देशमुख, रमेश सोनुले, उमेश बनसोड, निळकंठ ढोके यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.