
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या तरुणाची पोलिसांना ओळख पटली आहे. गौरव आहुजा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. यावेळी बोलताना त्यांनी गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते, त्याने रस्त्यावर नव्हे तर माझ्या तोंडावर
.
गौरव आहुजाने पुण्याच्या येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात भररस्त्यात बीएमडब्ल्यू कार थांबवून लघुशंका केली होती. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यात संतापाची लाट पसरली आहे. विशेषतः या प्रकरणी पोलिसांवरही टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारावर कार मालकाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. मनोज आहुजा असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते लघुशंका करणाऱ्या गौरवचे वडील आहेत. त्यांनी स्वतःच ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची पुष्टी केली आहे.
तो माझा मुलगा असल्याची लाज वाटते
मनोज आहुजा यांनी आपल्या मुलाच्या कृत्यावर तीव्र संतापही व्यक्त केला आहे. गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते. त्याने सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. घटनेत वापरलेली कार माझ्या नावावर आहे. त्यामुळे या प्रकरणी जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असे त्यांनी म्हटले. मनोज आहुजा यांचा पुण्यात एक बार असल्याची माहितीही उजेडात आली आहे.
काय दिसत आहे व्हायरल व्हिडिओत?
पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात पुणे – नगर रोडवर भररस्त्यात लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, दोन मद्यधुंद अवस्थेतील तरुण रस्त्याच्या मधोमध आपली आलिशान कार उभी करून थांबले आहेत. त्यापैकी एक तरुण गाडीतून उतरून रस्त्यावरच लघुशंका करतो. यावेळी त्याने रस्त्यावरच महिलांसमोर अश्लील चाळे केल्याचेही निदर्शनास येत आहे. त्याच्या सोबत असणारा दुसरा तरुण कारच्या समोरच्या सिटवर बसला आहे. त्याच्या हातातही दारुची बाटली आहे. हे दोघेही हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्यांना जाब विचारला असता ते भरधाव वेगात वाघोलीच्या दिशेने निघून गेले.
येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुण्याचे पोलिस आयुक्त हिंमत जाधव यांनी या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, एक तरुण भर रस्त्यावर अश्लाघ्य वर्तन करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. संबंधित तरुणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिसांकडे या प्रकरणाची सर्व माहिती उपलब्ध आहे. पण तपासात अडथळा येण्याच्या भितीने आम्ही ती उघड करणार नाही. कारवाई पूर्ण झाल्यानंतर आरोपींची नावे उघड केली जातील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.