
CM Devendra Fadnavis On Security To Aurangzeb Tomb: भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. तिथीनुसार आज शिवजयंती असून त्यानिमित्ताने आयोजित या सोहळ्यामध्ये मंदिराच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात गाजत असलेल्या औरंगजेबच्या कबरीसंदर्भात भाष्य केलं.
मंदिराचं कौतुक
मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीला या नव्या मंदिराचं कौतुक केलं. शिवक्रांती प्रतिष्ठानने हे मंदिर बांधून उत्तम काम केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. “मी आपल्या सर्वांना शिव जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि राजू चौधरी आणि नचिते महाराज यांचे आभार मानतो त्यांनी अतिशय सुंदर मंदिर आपल्याला दिले. महाराजांचे दर्शन कशासाठी तर आज आपण आपल्या इष्ट देवाची पूजा करतो ते केवळ शिवाजी महाराजांमुळे! इथे केवळ मंदिर नाही तर तटबंदी आहे. शिवाजी महाराजांचे सर्व प्रसंग इथे आहेत. आई तुळजाभवानी देखील आहे. आई जिजामाता देखील आहेत. हे राष्ट्रमंदीर आहे. त्यामुळे सर्वांना यातून प्रेरणा मिळेल,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
तिर्थ क्षेत्राचा दर्जा देणार
भिवंडीमध्ये उभारलेल्या शिवरायांच्या या मंदिराला तिर्थ क्षेत्राचा दर्जा देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. “सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांचा विकास करावा. आता फक्त छत्रपतींची मंदिरं व गड किल्ले व स्थळांचा विकास होईल. औरंगजेबाच्या कबरीचं कधीच उदात्तीकरण होणार नाही. जो कुणी करण्याचा कोणी प्रयत्न करेल तर ते करू देणार नाही,” असं फडणवीस म्हणाले.
रयतेच्या राज्याच्या सेवेसाठी रयतेच्या राजाचे आशीर्वाद!
‘छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे (शक्तिपीठ)’ शिवक्षेत्र मराडे पाडा, भिवंडी येथे लोकार्पण केले. याप्रसंगी महाराजांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. देव, देश आणि धर्मरक्षणासाठी ज्यांनी सर्वसामान्यांमध्ये प्राण ओतले… pic.twitter.com/NkQAvq6fij
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 17, 2025
देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती जगले
“ज्यावेळेला लढण्याची शक्ती क्षीण झाली होती, कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याचा प्रथा निर्माण झाली होती. त्यावेळी आई जिजाऊंचे संस्कार घेऊन यातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि परकियांना धडा शिकवला पाहिजे या हेतूने त्यांनी शिवरायांना घडवले,” असं फडणवीस म्हणाले. “प्रभु श्रीराम हे ईश्वर होते आणि शिवराय हे युग पुरुष होते. प्रभु श्रीराम रामांनी लोकांना सोबत घेऊन रावणाचे पतन केलं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी देखील केलं आणि मोघलांना पराभूत केलं. देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती जगले त्याचप्रमाणे आपण या छत्रपतींच्या मंदिरात जाताना आपण मनात विचार आणून जावं,” असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.
सरकारने हाती घेतलेली कामं
12 किल्ल्यांना ‘युनेस्को’मध्ये जागतिक वारसा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संगमेश्वरच्या वाड्याचा विकासाचं काम हाती घेतले आहे. छत्रपती ज्या कोठीत नजर कैदेत होते ती कोठीपण आपण विकसित करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच तुळापूर इथे देखील मोठे स्मारक आपण करत आहोत, असंही फडणवीसांनी सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे, आग्र्याला स्मारक व्हावे म्हणून निधी दिला आहे, पानिपत इथे देखील एक स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
…म्हणून औरंगजेबच्या कबरीला संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे
“इथे महिमा मंडन होईल तर शिवरायांचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही,” असं म्हणतानाच फडणवीसांनी औरंगजेबच्या कबरीला का संरक्षण दिलं जात आहे याचं कारणही सांगितलं. “औरंगजेबाच्या कबरीला भारतीय पुरातत्व खात्याने 50 वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे,” असं फडणवीस म्हणाले. “मात्र संरक्षण दिलं असलं तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीच होणार नाही,” असा शब्द फडणवीसांनी दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.