
Mumbai MHADA Lottery: म्हाडाने बांधलेली माहुलमधील 13 हजारांवर घरे रिक्त असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना साडेबारा लाखांत मालकी तत्त्वावर त्यांची विक्री केली जाणार आहे. या अनोख्या योजनेला पहिल्याच दिवशी समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे. 13 हजार घरांपैकी 9 हजार 98 घरांसाठी सोमवारपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 47 कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले आहेत.
पहिल्या दिवशी किती लोकांनी भरला अर्ज?
पहिल्याच दिवशी अर्ज भरणाऱ्या 47 कर्मचाऱ्यांपैकी 21 कर्मचाऱ्यांनी अनामत रक्कमही भरल्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. त्यातील 21 जणांनी अनामत रक्कम भरल्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने दिली. चेंबूर-माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांमध्ये बाधित कुटुंबे राहायला जात नसल्याने रिक्त आहेत. त्यांची पालिकेला देखभाल करावी लागते. म्हणूनच ही घरं अवघ्या 12 लाख 50 हजार रुपयांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं का बांधली आणि ती का नाकारली जात आहेत?
विविध विकास प्रकल्पांमध्ये घरे जाणाऱ्या प्रकल्पबाधितांना मुंबईतील माहुल येथे घरे बांधण्यात आली आहेत. परंतु माहुल येथील रासायनिक प्रकल्पांमधून प्रदूषण होत असल्याने तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे येथे पुनर्वसन करण्यासाठी रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. अनेकांना दमा, टीबी आदी आजारांच्या समस्या निर्माण झाल्याच्या तक्रारी आहेत.
…म्हणून 13 हजार घरं रिकामी
या घरांमध्ये राहण्यास प्रकल्पबाधित तयार नाहीत. आपल्या या मागणीसाठी प्रकल्पबाधितांनी आंदोलनही केले होते. या प्रकल्पबाधित इमारतींमध्ये पुनर्वसन न करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालिकेच्या पुनर्वसनाच्या निर्णयानंतरही सुमारे 13 हजारांवर घरे रिक्त राहिली आहेत.
अशी असेल अर्जाची प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली तारीख : 15 मार्च
अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम तारीख : 15 एप्रिल
सोडतीसाठी अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची तारीख : 16 एप्रिल
घरांसाठी पूर्ण रक्कम भरण्याची अंतिम तारीख : 12 ऑक्टोबर
लॉटरी काढून होणार घरांचे वितरण
15 एप्रिल ही या घरांसाठी अर्ज सादर करण्यासाठी शेवटची मुदत आहे. त्यानंतर लॉटरी काढून घरांचे वितरण केले जाणार आहे. म्हाडाच्या लॉटरी पद्धतीनुसारच घरांचं वितरण होणार आहे.
अनेक रासायनिक कारखाने
माहुल हे आरसीएफ, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, टाटा पॉवर, इंडियन ऑइल, ओएनजीसी आणि एजिस लॉजिस्टिक्स या सारख्या मोठ्या कंपन्यांबरोबरच रासायनिक कारखाने आहेत. त्यामुळेच या ठिकाणी राहण्यास अनेकांचा नकार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.