
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील आजपर्यंतचा सर्वात पावरफुल पक्ष प्रवेश होणार आहे. महााराष्ट्रातील 5 बडे नेते एकाचवेळी एकाच पक्षात प्रवेश करणार आहेत. अजित पवारांच्या पक्षात हा पक्षप्रेवश होणार आहे. यामुळे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांना बसणार चेकमेट होणार आहे.
सांगली जिल्ह्यातलं राजकारण आता बदलणार आहे.जिल्ह्यातील पाच दिग्गज नेत्यांनी आपला पक्ष सोडून राष्ट्रवादी अजित पवारांचे घड्याळ बांधले आहे. यामध्ये चार माजी आमदारांसह एक जिल्हा परिषदेच्या माजी सभापतींसह अनेकांचा समावेश आहे.
यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी आमदार अजितराव घोरपडे,शिराळयाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक,आटपाडीचे राजेंद्र देशमुख यांच्यासह जतचे माजी सभापती तमन्नगौडा रवी पाटील यांचा समावेश आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पाडला आहे.या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद फारशी नव्हती,त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जिल्ह्यावर प्राबल्य राहिलं.
याच जिल्ह्यात विलासराव जगताप,राजेंद्रअण्णा देशमुख,अजितराव घोरपडे आणि शिवाजीराव नाईक,या चारही नेत्यांचं आपल्या तालुक्यात मोठे प्राबल्य आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आर आर पाटील आणि जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस याच नेत्यांमुळे भक्कम झाली होती,मात्र कालांतराने वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला होता.
विलासराव जगताप यांनी भाजपाला रामराम करत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपा विरोधात काम केलं,तर माजी मंत्री अजित घोरपडे यांनी विधानसभेला अजित पवार गटाच्या संजयकाका पाटलांना साथ दिली,तर शिराळ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक पक्षासोबत राहिले होते,तर आटपाडीचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी शरद पवार गटात दाखल होऊन अपक्ष म्हणून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. तर भाजपातून बंडखोरी करत तमनगौडा रवीपाटील यांनी भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आता या पाचही नेत्यांनी सत्तेतल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाण्याचा मार्ग निवडला. मात्र या नेत्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला कोणताच फरक पडणार नाही,असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
जत मधला राष्ट्रवादी अजित पवार गटातील विलासराव जगताप आणि तमनगौडा रवी पाटील यांचा पक्षप्रवेश हा महत्त्वाचा मानला जातो.अजित पवारांनी सांगली जिल्ह्यात आपली पावर वाढवताना,त्यांचे विरोधक मानले जाणारे आमदार गोपीचंद पडळकरांना देखील शह देण्याचा प्रयत्न केलाय.आमदार गोपीचंद पडळकर ज्या जत मतदार संघातून निवडून आले,त्या मतदारसंघातील माजी आमदार विलासराव जगताप आणि भाजपचे माजी जिल्हा परिषदेचे सभापती तमनगौडा रवी पाटील यांना पक्षात घेतलंय. जत तालुक्यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांची मोठी ताकद आहे,जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि नगरपालिके मध्ये विलासराव जगताप यांना मानणारा मोठा गट आहे.तर दुसऱ्या बाजूला रवीपाटील यांचे देखील जतच्या पूर्व भागात चांगलंच वर्चस्व आहे.
जत विधानसभा निवडणुकीत विलासराव जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता,तर तमनगौडा रवी पाटील यांच्या ऐवजी भाजपाने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली,त्यामुळे तमनगौडा रवी पाटलांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली.त्यानंतर विलासराव जगताप आणि तमनगौडा रवी पाटील हे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राहिले, आता या पडळकरांच्या विरोधकांना अजित पवाराकडून ताकद देऊन गोपीचंद पडळकरांची राजकीय कोंडी करण्याची खेळी केल्याचं बोललं जातं आहे
सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेच वर्चस्व राहिले,मात्र आता जयंत पाटील यांना देखील अजित पवारांनी पाच दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून चेकमेट देण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे जयंत पाटलांचे कट्टर विरोधक असणारे निशिकांत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्यानंतर निशिकांत पाटलांवर जयंत पाटलांचा जिल्ह्यातला करेक्ट कार्यक्रम करण्याची जबाबदारी सोपवली. यातूनच माजी आमदारांची फौज आता अजित पवारांच्या दिमतीला गेलीय,त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवारांकडून जयंत पाटलांना शह देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.