
प्रवीण तांडेकर, झी मीडिया
Bhandara Village: भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील गटग्रामपंचायतीने एक गावकऱ्यांसाठी भन्नाट ऑफर्स आणली आहे. या ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. आणखी एक भन्नाट निर्णय ग्रामपंचायतच्या मासिक सभेच घेण्यात आला आहे. संपूर्ण कुटुंबाला विमानप्रवास घडणार आहे. भंडारा जिल्ह्यातील वलमाझरी गावाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या विमानप्रवासासाठी एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे.
साकोली तालुक्यातील खैरी, वलमाझरी, पिटेझरी आणि आमगाव अशा चार गाव मिळून गटग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत राज्यस्तरीय तसेच केंद्र शासनाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. तसेच गावातील कचरा गोळा करून त्यापासुन खत निर्मिती केली जाते. गावं कार्बन न्यूट्रल होण्यासाठी गावात प्रतेक घरी व परिसरात झाडे लागवड केली आहे या ग्रामपंचायत अंतर्गत चारही गावात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याला लोकांचाही तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
गावातील लोकात ही भावना कायम राहावी आणि आपले गाव स्वच्छ, निरोगी, सुंदर व सदा हरित राहण्यासाठी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे जनतेसाठी नवनवीन कल्पना राबवित असतात. त्यांच्या या कामाला त्यांचे ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, सचिव, गावातील वरिष्ठ नागरिक आणि गावकरी सहकार्य करीत असतात. खैरी-वलमाझरी ग्रामपंचायतमध्ये २३ एप्रिलला पार पडलेल्या मासिक सभेत एक आगळावेगळा ठराव मांडण्यात आला. या ठरावाची सगळीकडे चांगलीच चर्चा होतेय.
सन 2025-26 चे सर्व प्रकारचे घर कर व पाणी पट्टी कर व त्यापूर्वीचे सर्व कर दि. 15 मे 2025 पर्यंत जे लाभार्थी भरतील अशा लाभार्थ्यांचा लकी ड्रॉ काढण्यात येईल. या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला नागपूर ते हैदराबाद विमान प्रवास, तिथे राहण्याची व्यवस्था आणि परत येतांना रेल्वेचा वातानुकुलीत प्रवास अशी संधी दिली जाईल. तसेच व्दितीय क्रमांकाला १०० किलो जय श्रीराम तांदूळ, तृतीय क्रअमांकला कुटुंबातील ५ लोकांना अभयारण्याची सफारी, चौथा क्रमांकाला २० किलो तुरीची डाळ, पाचव्या क्रमांकला एक टिन खादय तेल आणि सहाव्या क्रमांकला एक चांदीचा शिक्का असे बक्षीस देण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे.
यासोबतच ड्रॉबरोबर सर्व कर भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला मोफत कणिक दळून दिली जाईल. मोफत आरोचे शुद्ध पाणी सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत अंतर्गत चारही गावातील कुटुंब आता संपूर्ण कर भरण्याच्या तयारीला लागले असून त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतचा हा निर्णय गावाच्या विकासात एक पाऊल पुढे नेणारा ठरल्याने सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.