
10th Exam Result : 13 मे रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी इयत्तेचा निकाल जाहीर झाला असून यात राज्याचा निकाल 94 टक्के लागला आहे. राज्यातील अनेक मुलं मुलींना या परीक्षेत घवघवीत यश मिळालं असून काही विद्यार्थ्यांनी तर 100 पैकी 100 मार्क सुद्धा मिळवले आहेत. परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा ऐकायला मिळत असताना आता बीडच्या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाची सुद्धा बरीच चर्चा रंगतेय.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील धीरज देशपांडे यांच्या जुळ्या मुली अनुष्का आणि तनुष्का यांनी यंदा दहावी इयत्तेची परीक्षा दिली. आष्टीच्या दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या या जुळ्या बहिणींना दहावी इयत्तेमध्ये 96 टक्के गुण मिळाले आहेत. दहावी इयत्तेत एकसारखे गुण मिळाल्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात या जुळ्या बहिणींची चर्चा आहे.
एकत्र करायच्या अभ्यास :
अनुष्का आणि तनुष्का देशपांडे या दोघी जुळ्या बहिणी अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार होत्या अशी माहिती त्यांच्या शिक्षकांनी दिली. तसेच दोघी बहिणींना नृत्याची सुद्धा आवड असून दोघीजणी शालेय उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायच्या. तसेच अनुष्का आणि तनुष्का या दोघी सतत ऐकत्र अभ्यास करायच्या, एकमेकींच्या शंकांचं निरसन करायच्या, तसेच शाळेत सुद्धा सोबतच जायच्या.
एक सारखे गुण मिळतील अशी अपेक्षा नव्हती :
जुळ्या मुलींना परीक्षेत घवघवीत यश मिळाल्यामुळे देशपांडे कुटुंबाने त्यांच्या यशाचा आनंद साजरा केला. निकाल जाहीर झाल्यावर सेम टू सेम गुण पाहून बहिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ‘एकसारखे गुण मिळतील असं वाटलं नव्हतं, पण निकाल लागल्यावर खूप आनंद झाला’ , अशी प्रतिक्रिया अनुष्का देशपांडे हिनं दिली.
दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी :
दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींची एकूण टक्केवारी 96.14 तर मुलांची 92.31 टक्के इतकी आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे काठावर पास होणाऱ्या मुलांची संख्यादेखील जास्त आहे. संपूर्ण राज्यभरातून फक्त 35 टक्के मिळालेले विद्यार्थी 285 आहेत. त्यामुळं एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 35 टक्के म्हणजे काठावर पास असा शेरा देण्यात येतो. त्याचबरोबर यंदा राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर, 75 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी 4 लाखांच्यावर आहेत. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 टक्के आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.