
अकरावीच्या प्रवेशासाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी सकाळपासून सुरू झाली, मात्र प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ ठप्प झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. या संदर्भात शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधला
.
यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यभरातून 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यात एकूण 20,91,390 जागा उपलब्ध आहेत. प्रवेशप्रक्रियेची सुरुवात 21 मे रोजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच संपूर्ण राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यापूर्वी ही प्रक्रिया फक्त मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका क्षेत्रांपुरती मर्यादित होती.
यंदापासून संपूर्ण राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरळीत पार पडेल की नाही, याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आधीपासूनच शंका व्यक्त करण्यात येत होत्या. त्या शंका प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी खरी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बुधवारी सकाळपासून अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी संकेतस्थळ ठप्प असल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला संकेतस्थळावर ‘502 Bad Gateway’ असा संदेश दिसत होता, तर नंतर दुपारी ‘संकेतस्थळाचे काम सुरू आहे’ असा संदेश झळकू लागला. त्यामुळे सकाळपासून सायबर कॅफे किंवा घरातील संगणकासमोर अर्ज भरण्यासाठी बसलेले विद्यार्थी आणि पालक मानसिक त्रासाला सामोरे गेले.
हेल्पलाईनही निरुपयोगी
या प्रक्रियेत काही समस्या आल्यास संकेतस्थळावर हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. पालक व विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तोही निरुपयोगी असल्याचे दिसत आहे. कुठल्याच प्रकारचा संपर्क झाला नाही. त्यामुळे नेमके काय झाले आहे, याची काहीच कल्पना येत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.