
Maharashtra Weather News : अरबी समुद्रात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थितीसुद्धा मान्सूनच्या वेगापुढे फिकी पडली असून, अखेर केरळमध्ये आठवडाभर आधीच धडकलेला मान्सून कोकणातही विक्रमी वेगानं दाखल झाला आणि हवामान विभागानंही यावर आश्चर्य व्यक्त केलं. पहिल्यांदाच राज्यात मान्सून 25 मे रोजी दाखल झाल्यानं सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाल्याचं पाहायला मिळालं. राहिला प्रश्न आता मान्सून येण्यानं नेमकं काय बदलणार? तर, हा पाऊस काही इतक्यात राज्याची पाठ सोडणार नाही.
पावसाच्या माऱ्यासाठी तयार राहा…
महाराष्ट्राच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवत हवामान विभागानं इथं ऑरेंज अलर्ट लागू केला आहे. प्रामुख्यानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत हवामान विभागानं या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांनाही पावसाच्या धर्तीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार…
गेल्या 24 तासांपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळाली असून पुढील 24 तास (26 मे 2025) पावसाचा जोर दुपटीनं वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मागील 24 तासांमधील आढावा…
पुण्याच्या बारामती मध्ये रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यामुळं ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. ज्यामुळं बारामती शहरातील एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक शेजारील तीन इमारती पावसानं खचल्या. या इमारतींची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून या इमारतींची पाहणी करण्यात आली. तर, तिथं नाशिकच्या सिन्नरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळं सिन्नर शहरात असलेलं बस टर्मिनलचे शेड कोसळलं.
तिथं सोलापूर जिल्ह्यातील भीमा निरा आणि मान नदीवर असणाऱ्या बंधार्यावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्याचे आदेश प्रशासनानं जारी केले. भीमा नीरा खोऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे त्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन त्यावरील बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.