
Sanjay Raut Slams Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्त संजय राऊत यांनी गुवाहाटीमधील कामाख्या मंदिरामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसहीत त्यांच्या पक्षातील खासदारांनी प्राणी-पक्षांचे बळी दिल्याचा दावा केला आहे. दोन आठवड्यांपूर्वा कामाख्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या राऊतांनी तेथील स्थानिकांशी झालेल्या संवादाचा संदर्भ ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरामध्ये दिला आहे. बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगे मुंबई-महाराष्ट्रात आणून पुरल्याचाही दावा राऊतांनी केला आहे.
जमिनीवर रेडे व बैलांची ताजी मुंडकी रांगेत
“एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात पंधरा दिवसांपूर्वी होतो. मी नास्तिक नाही, पण धर्माचे, व्रतवैकल्यांचे अतिरेकी अवडंबर म्हणजे हिंदू धर्म नाही असे मानणाऱ्या पंथातला मी आहे. त्या दिवशी रविवार होता व अमावस्या होती. कामाख्या मंदिर व परिसर प्रचंड गर्दीने ओसंडून वाहत होता. एक प्रकारचा सुकलेल्या रक्ताचा दर्प त्या परिसरात घोंघावत होता. दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडे बदके, बकऱ्या व इतर प्राणी होते. ते देवीला बळी देण्यासाठी आणले होते, हे स्पष्ट दिसले. मंदिरात जाण्यासाठी प्रचंड रेटारेटी चालली होती. मंदिराचा गाभारा खोल आहे व रहस्यमय आहे. मूर्तीचे दर्शन घेऊन डावीकडे खोल जमिनीवर पाहिले तेव्हा अस्वस्थ झालो. जमिनीवर रेडे व बैलांची ताजी मुंडकी रांगेत ठेवली होती आणि त्यांच्या समोर ‘यजमान’ बसवून ‘पांडा’ मंडळी विधी करत होती. ताजे बळी प्रयोग मंदिराच्या मागच्या बाजूला झाले व ते मंदिरात आणले गेले. आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी व शत्रूचा काटा काढण्यासाठी हे ‘बळी विधी’ या मंदिरात देतात आणि ते सर्व हिंदुत्वाच्या नावाखाली खपवले जातात. महाराष्ट्रातील मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावले व त्याची आठवण गाभाऱ्यातील ‘पांडा’ लोकांनी माझ्याकडे काढली,” असं राऊत यांनी ‘रोखठोक’ सदरातील लेखात म्हटलं आहे.
नेमका काय संवाद झाला?
‘पांडा’ लोकांसोबत काय संवाद झाला हे राऊतांनी पुढे सांगितले आहे.
“आम्ही तुम्हाला ओळखतो. आप महाराष्ट्र के पालिटिशियन है,” असे ते मला म्हणाले.
साडेतीन वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात व मंदिराच्या परिसरात नेमके काय घडले हे त्यातील ‘पांडां’नी स्वतःच सांगायला सुरुवात केली.
“वो शिवसेना के लोगो ने यहां आकर बहोत विधी पूजा किया पांडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया”
“कितने लोग थे”, मी.
“वो एकसाथ पचास-साठ लोग आए थे,” पांडा.
“कौनसा पूजा किया?” मी.
“यहां जो होता है सब पूजा किया. बली भी चढाया देवी को,” पांडा.
“कौनसा बली दिया?” मी.
“भैसा को काटा. कुछ लोगोंने बदक को भी काटा. शत्रूपर विजय प्राप्त करने के लिये सभी ने बली चढाया,” पांडा.
मंतरलेली शिंगे कोणी कोठे पुरली ते रहस्यच
“पांडा म्हणाला, बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे व इतर प्राण्यांचे बळी चढवले. त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगे कापून सोबत नेली. या शिंगांना ‘सिंदूर’ लावून ती मंतरली जातात व ईप्सित स्थळी खोल पुरून मनोकामनेची पूजा केली जाते. त्यासाठी याच मंदिरातील पांडांना बोलावले जाते. मुंबई-महाराष्ट्रात ही शिंगे आणली गेली. ती सर्व मंतरलेली शिंगे कोणी कोठे पुरली ते रहस्यच आहे,” असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.
सर्व अंधश्रद्धाळू महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत
“शिंदे यांच्या काळात ही शिंगे ‘वर्षा’ बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असे मी लिहिले तेव्हा खळबळ उडाली. मुख्यमंत्री फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती. आज फडणवीस ‘वर्षा’वर गेले व त्याआधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ‘वर्षा’ परिसरातील मोकळ्या जमिनीचे स्पानिंग करून घेतले. या शोध मोहिमेत तेथे पुरलेली रेड्यांची शिंगे मिळाली काय? हा पहिला प्रश्न व श्री. फडणवीस यांचे संपूर्ण समाधान झाले काय? हा दुसरा प्रश्न. अंधश्रद्धेविरुद्ध लढणारा असा हा पुरोगामी महाराष्ट्र. संत गाडगेबाबांपासून प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी या लढाया लढल्या. नरेंद्र दाभोळकरांना तर त्यासाठी बलिदान द्यावे लागले. त्या महाराष्ट्रात शेवटी अंधभक्ती व अंधश्रद्धेचे पेव फुटले आणि हे सर्व अंधश्रद्धाळू महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत व त्यांनी जनतेलाही कर्मकांडास जुंपले,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
सर्व समस्यांवर जादूटोणा व शंखनाद हाच उतारा
“मूर्तिपूजा, कर्मकांड व बळी प्रथेविरुद्ध संत गाडगेबाबांनी आयुष्य वेचले तरीही हिंदू धर्मात व शक्तिपीठे समजल्या जाणाऱ्या आपल्या मंदिरांत हे सर्व सुरू आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रात कामाख्या मंदिराची प्रसिद्धी केली. त्यानंतर या मंदिराकडे महाराष्ट्रातील लोकांचा ओघ वाढला व ते बळी देण्यासाठी रांगेत उभे राहू लागले. ठाणे परिसरातील किमान शंभरावर लोक मला मंदिर परिसरात दिसले. पुरोगामी महाराष्ट्राची ही वाट बिकट आहे. कारण सर्व समस्यांवर जादूटोणा व शंखनाद हाच उतारा येथे ठरला आहे,” असं राऊत यांनी म्हटलंय.
विधी करणारे आणि कुंडल्या पाहणारे लोक नेमले
“एखादे मांजरदेखील राजाकडे धीट नजरेने बघू शकते, पण महाराष्ट्रात स्वतःला ‘वाघ’ समजणाऱ्यांची अवस्था शेळ्यांसारखी झाली व ते हुकूमशहांना शरण गेले. मानसिक स्वास्थ्य आणि शत्रूवर विजय मिळविण्यासाठी जादूटोणा व अघोरी तंत्राचा आधार घेतला. शिंदे गटातले बहुतेक सर्व लोक या ‘अघोरी’ मार्गाला लागले व त्यांनी मासिक पगारावर असे विधी करणारे आणि कुंडल्या पाहणारे लोक नेमल्याची माहिती त्यातील एका आमदाराने दिली तेव्हा पुरोगामी महाराष्ट्राचे भविष्य नक्की काय? या चिंतेने मी अस्वस्थ झालो. डरपोक मनुष्य शेवटी अंधश्रद्धेच्या मार्गाने जातो. त्या सगळ्यांसाठी राल्फ इमर्सनचे एक वचन देतो आणि विषय संपवतो. इमर्सन म्हणतो, “ज्यांच्यापाशी आत्मविश्वास आहे ते कोणत्याही संकटावर मात करतात. दररोज एका तरी भीतीवर जो विजय मिळवत नाही त्याला आयुष्याने काहीच शिकवले नाही असे म्हटले पाहिजे,” असं लेखाच्या शेवटी राऊतांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.