
Maharashtra Amboli Water New Rules: पावसाळा सुरू झाला की अनेकांचेच पाय विविध पर्यटनस्थळं आणि विशेष म्हणजे धबधबे किंवा तत्सम जलस्त्रोतांकडे वळतात. रायगड, कोकणापासून अगदी पश्चिम महाराष्ट्रातील इतरही बहुतांश भागांमध्ये पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक हजेरी लावतात. यंदाच्या वर्षीसुद्धा अशाच पावसाळी सहलींसाठी निघण्याचा बेत आतापासूनच अनेकजण बनवत आहेत. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडल्याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. कारण, आता पर्यटकांना पावसाचा आनंदसुद्धा आखून दिलेल्यावे वेळेतच घ्यावा लागणार आहे.
आंबोली धबधब्यावर जाण्याआधी हे वाचा…
दरवर्षी पावसाच्या दिवसांमध्येच नव्हे तर वर्षातील इतर काही दिवसांनासुद्धा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणाऱ्या आंबोली घाटामध्ये बरीच गर्दी पाहायला मिळते. पावसाळ्यात तुलनेनं ही गर्दी वाढते. पर्यटकांसाठी आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या याच धबधब्याच्या परिसरामध्ये दिवसागणिक वाढली गर्दी, पावसाचे दिवस पाहता आता इथं येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या हेतूनं स्थानिक प्रशासनानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
पावसाच्या दिवसांमध्ये आंबोली घाट आणि नजीकच्या क्षेत्रामध्ये धुक्याची चादर, प्रकाशाचा अभाव असल्या कारणानं दृश्यमानता कमी होताना दिसत आहे. ज्यामुळं या भागामध्ये अपघातांची साखळीसुद्धा पाहायला मिळत आहे. अपघातांचा हाच वाढता धोका पाहता, प्रशासनानं सावधगिरीची पावलं उचलण्यास सुरुवात केली असून, इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
नव्यानं जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार आंबोली घाटातील मुख्य धबधबा, हिरण्यकेशी, महादेवगड पॉईंट, कावळेसाद इथं शनिवार आणि रविवारी सायंकाळी 5 वाजल्यानंतर पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. तर, या वेळेपर्यंत धबधबे आणि व्ह्यू पॉईंट परिसरामध्ये असणाऱ्या पर्यटकांनासुद्धा बाहेर काढलं जाणार आहे, या भागातून खाली उतरवलं जाणार आहे. सायंकाळी 5 वाजल्यानंतर घाट परिसरामध्ये अतिदक्षता राखण्याच्या सूचना जारी करत तिथं असणारे विविध छोटेखानी स्टॉलसुद्धा बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनानं जारी केले आहेत.
घाट क्षेत्रामध्ये प्रवाहित झालेलेल जलस्त्रोत, धुक्याची चादर आणि अधूनमधून कोसळणाऱ्या दरडी अशी एकंदर परिस्थिती पाहता हे नियम लागू करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. तर, पर्यटकांनीसुद्धा सुरक्षिततेच्या हिशोबानं या नियमांचं पालन करावं आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.