
ज्ञानेश्वर पतंगे झी 24 तास धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं भव्यदिव्य ऐतिहासिक शिल्प तुळजापुरात उभारलं जाणार आहे. 108 फूट उंच या भव्य शिल्पाच्या रुपावरून तुळजापुरात वाद निर्माण झाला आहे. हे शिल्प नेमकं कसं असावं यावर मतमतांतरं का आहेत? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तुळजाभवानी मंदिर परिसरात 108 फुटी भव्यदिव्य ऐतिहासिक शिल्प उभारण्यात येणार आहे. या शिल्पाचं संकल्पचित्र प्रकाशित झालं आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं. तुळजा भवानी देवीचं मूळ स्वरूप बदलून दाखवलं जात असल्याचा आरोप पुजारी मंडळ, मराठा क्रांती मोर्चा यांनी केला आहे. मंदिर संस्थानने जाहीर केलेल्या संकल्पचित्रात आई तुळजाभवानी अष्टभुजा अवस्थेत शिवरायांना भवानी तलवार देताना दाखवलं आहे. मात्र प्रत्यक्ष इतिहासात देवी दोन भुजांमध्ये तलवार देताना आहे.. आता हाच मुद्दा वादाचा मुद्दा ठरला आहे.
या वादात आणखीन पेट आणणारा मुद्दा ठरला तो मंदिर संस्थानने पुजारी मंडळांना पाठवलेलं पत्र. या पत्रात आई तुळजाभवानीला भारतमाता आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असं म्हटलं आहे. मात्र इतिहासात देवी तुळजाभवानीला भारतमाता म्हणून कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे हे पत्र देखील वादग्रस्त ठरलं आहे
तुळजापूरमध्ये साकार होत असलेल्या या भव्यदिव्य शिल्पाबाबत काही मुद्द्यांवर वाद निर्माण झाला आहे. तुळजाभवानीच्या भारतमाता या रुपाचा वाद आता मुंबईपर्यंत गेला आहे. १७ जूनला यासंदर्भात मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. तर खुद्द पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीही तुळजाभवानीच्या होऊ घातलेल्या शिल्पाच्या अष्टभुजा रूपावरून नाराजी व्यक्त केली आहे.
तुळजाभवानीचं शिल्प मूळ ऐतिहासिक स्वरूपातच असलं पाहिजे. देविच्या अष्टभुजा रूपाला विरोध असल्याचं शिल्पाला विरोध असणा-यांचं म्हणणं आहे. इतिहासाशी छेडछाड नको… भवानी तलवार देतानाच मूळ शिल्प तयार करा, आम्ही यासाठी लढा देणार…” तर तुळजाभवानीच्या रुपाबाबात निर्माण झालेल्या वादावर मंदिर संस्थानचे विश्वस्त व भाजपा आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. कला संचालनालयाचं म्हणणं अंतिम असेल , आणि हा वाद सामोपचाराने मिटवला जाईल, आणि यासाठी बैठक बोलावल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनीच्या भारतमाता रुपाबाबत आता मुंबईतल्या बैठकीत चर्चा होणार आहे. संकल्पचित्रात प्रकाशित झाल्याप्रमाणे तुळजाभवानीचं शिल्प साकारणार असेल तर “तुळजाभवानी शिल्पाचा वाद चिघळण्याची चिन्हं दिसतातय. त्यामुळे या शिल्पचित्रातील तुळजाभवानीच्या शिल्पाबाबतचं भवितव्य या बैठकीतच स्पष्ट होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.