
Shivsena Foundation Day Raj And Uddhav Thackeray Alliance: आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सामना’च्या अग्रलेखातून सूचक इशारा देण्यात आला आहे. “मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना 59 वर्षांची झाली. उद्या ती साठ, सत्तर, पंचाहत्तर वर्षांची आणि एक दिवस शंभरी पार करून पुढे जाईल. शिवसेनेचा हा प्रवास नेहमीच खडतर आणि संघर्षाचा राहिला, पण त्या संघर्षाचे, संकटाचे कधी रडगाणे कोणी गायले नाही. लढण्याचे प्रसंग जेव्हा जेव्हा आले, तेव्हा तेव्हा लढणारे शिवसेनेसोबत राहिले आणि रडणारे पळून गेले. शिवसेना आजही त्याच पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून तिच्या वाईटावर टपून बसलेल्या अवलादी आजही आहेत. आपलेच मराठी बांधव खास करून त्यात आहेत,” असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
आमचे मराठी जनतेला हे वचन आहे
“सत्ता आणि पैशांच्या मगरुरीने मस्तवाल झालेल्या छत्रपती शिवरायांच्या काळातही अशा अवलादी होत्याच. मराठी जनांचे ‘हिंदवी’ स्वराज्य निर्माण होऊ नये म्हणून तेव्हा शिवरायांच्या आसपासच्या स्वकीयांनीच फितुऱ्या केल्या. वतनदारीच्या तुकड्या-ताकड्यांसाठी स्वराज्याशी फितुरी केली. तेच फितूर छत्रपती संभाजीराजांनाही अडथळे ठरले व त्याच फितुरांनी संभाजीराजांना मोगलांच्या हाती देऊन महाराष्ट्र धर्माशी बेइमानी केली. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पायदळी तुडवून गुजराती व्यापार मंडळाच्या कच्छपी लागलेल्या अवलादीबाबत कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. जे लोक छत्रपतींचे स्वराज्य जमीनदोस्त करायला निघाले होते, त्यांच्या अवलादी आज वळवळत आहेत व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करून मुंबई-महाराष्ट्राचा घास गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याच्या विचारात आहेत. नव्हे, त्यांनी मुंबईचा सौदा करूनही टाकला, पण जोपर्यंत स्वाभिमानी शिवसेना येथे ठामपणे उभी आहे, तोपर्यंत मुंबईचा तुकडा यांच्या बापजाद्यांना पाडता येणार नाही. शिवसेनेच्या 59 व्या वर्धापनदिनी आमचे मराठी जनतेला हे वचन आहे,” अशा कठोर शब्दांमध्ये ठाकरेंच्या सेनेनं हल्लाबोल केला आहे.
मोदींनी 20 हजार कोटींचे विशेष ‘आरामदायक’ विमान…
“आज महाराष्ट्राची आणि देशाची चिंता तशी कुणालाच नाही. व्यापारी सत्तेच्या खुर्च्यांवर बसले की, दुसरे काय होणार? हा देश आधी डच, पोर्तुगीज, मोगल, इंग्रजांनी लुटला. ज्या ‘सुरत’ची लूट छत्रपतींनी स्वराज्य रक्षणासाठी केली तेच सुरत ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी आता मुंबई-महाराष्ट्रच नव्हे, तर देश लुटत आहेत. देशभरात पूल कोसळत आहेत, एअर इंडियाची विमाने पडत आहेत. कश्मीर खोऱ्यांत दहशतवादी स्वस्थ बसलेले नाहीत. पहलगाम हल्ल्यात आमच्या 26 मायभगिनींचे कुंकू पुसले. त्यांचा आक्रोश थांबलेला नाही. अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या चिता विझल्या नाहीत आणि आपले लाडके पंतप्रधान नरेंदर मोदी हे विदेश दौऱ्यावर गेले. आतापर्यंत मोदींनी 200 विदेश दौरे केले असतील. आपल्या दौऱ्यासाठी 20 हजार कोटींचे विशेष ‘आरामदायक’ विमान खरेदी केले. यातून देशाला काय मिळाले?” असा सवाल ‘सामना’मधून विचारण्यात आला आहे.
एक कमजोर पंतप्रधान व त्यांचे तितकेच लाचार…
“‘ऑपरेशन सिंदूर’चा पुकारा केला तेव्हा मोदींनी दौरे केलेल्यांपैकी एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. चीनपासून तुर्कस्तानपर्यंतचे देश भारताविरोधात उभे ठाकले व शेवटी अमेरिकेच्या प्रेसिडंट ट्रम्प यांनी व्यापाराची भीती दाखवून भारताला युद्ध थांबवण्यास भाग पाडले. दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढा त्यामुळे अर्धवटच राहिला. त्यानंतर पंतप्रधान मोदी व त्यांच्या भगतगणांची दातखिळी बसली ती अद्यापि उघडलेली दिसत नाही. एक कमजोर पंतप्रधान व त्यांचे तितकेच लाचार सरकार देशावर राज्य करीत आहे आणि त्या कमजोर राज्यकर्त्यांनी देशाला फक्त अंधश्रद्धा आणि भक्तिरसात गुंगवून ठेवले आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीतून ‘मराठी’ माणूस कायमचा…
“जे राष्ट्रीय स्तरावर तेच महाराष्ट्रीय स्तरावर. ‘खाण तशी माती’ त्यातलाच हा प्रकार. शिवरायांचे नाव सांगणारा महाराष्ट्र आज तेज हरवून बसला आहे. देश हिमालय राहिलेला नाही व महाराष्ट्रात आता ‘सह्याद्री’ उरलेले नाहीत. महाराष्ट्राचा मराठी बाणा आणि मराठी कणा यावरच आजच्या दिल्लीश्वरांनी लाथ घातली आहे. महाराष्ट्र म्हणजे दिल्लीच्या वाटेवरील एक पायपुसणेच बनले आहे. महाराष्ट्राचा तो रुबाब, ते वैभव आणि तेज सुरत ईस्ट इंडिया कंपनीने नष्ट केले व त्यासाठी त्यांना मराठी माणसांत फूट पाडावी लागली. बाळासाहेब ठाकरे यांची अस्सल स्वाभिमानी शिवसेना व नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणा वापरून तोडल्यावरही या त्रस्त समंधांचा आत्मा शांत झालेला नाही. त्यांना महाराष्ट्राच्या राजधानीतून ‘मराठी’ माणूस कायमचा हद्दपार करायचाच आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.
संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा
“हे आक्रमण थांबवायचे असेल तर मराठी ऐक्याची महागर्जना घुमवावी लागेल. त्यादृष्टीने एक ज्वलंत लोकभावना सध्या महाराष्ट्रात चर्चेला आली आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करायचे असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे या लोकभावनेची तीव्रता वाढली आहे व उद्धव ठाकरे यांनी मराठी ऐक्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या सर्व बेइमानांचे धाबे दणाणले. ही अशा पद्धतीने ‘मराठी एकजूट’ झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे तडीपार व्हावे लागेल या भीतीने अनेकांची गाळण उडाली. ‘एसंशिं’ गटापासून भाजपच्या व्यापार मंडळापर्यंत प्रत्येक जण देव पाण्यात घालून बसला आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट पुन्हा एकदा फोडायची असेल तर संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू झाला आणि तसे झालेच,” असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीचा संदर्भ दिला आहे.
एक मात्र नक्की, शिवसेना कदापि…
“मुख्यमंत्री देवेंदर फडणवीस व राज ठाकरे यांची भेट एका पंचतारांकित हॉटेलात झाली (अहो, झाली तर झाली!), पण लगेच भाजपमध्ये आणि ‘एसंशिं’ गटात उत्सव सुरू झाला. ‘‘मराठी जनांची एकजूट मोडली हो!’’ म्हणून हे लोक पेढे वाटू लागले. भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’चा मथळाच सांगतोय की, ‘आनंदी आनंद गडे, चर्चा थंडावली, राज-उद्धव युतीला विराम, फडणवीस-राज भेटीमुळे युतीच्या चर्चांना अचानक ब्रेक लागला आहे.’ विषाला उकळी फुटते ती अशी. भाजप आणि फडणवीसांचा कावा यात स्पष्ट दिसतो. लोकांत संभ्रम, संशय निर्माण करणे, मराठी माणसांच्या एकजुटीला ‘ब्रेक’ लागल्याचा आनंद साजरा करणे हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे. मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्षे ठामपणे उभी आहे. शिवसेना शतायुषी होईल. त्यापुढे जाईल. जे सोबत येतील त्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढून. महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे. पण एक मात्र नक्की, शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्नपुढे झुकणार नाही,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.