
वैजापूर तालुक्यात रानडुकरे पेरणी झालेले पिके फस्त करत आहेत, या रानडुकरांचा तत्काळ बंदोबस्त करा, असे आदेश तहसीलदार सावंत यांनी वन विभागाला दिले आहे.
.
लासूरगाव येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत सोमवारी थेट शेतात उतरले. गट नंबर २०८ मधील वसंत हुमे, आशोक हुमे, योगेश कुलकर्णी, विठ्ठल निघोटे, बाळू हुमे, राहुल निघोटे, शिवाजी निघोटे यांच्यासह इतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. उपसरपंच रितेश शेठ मुनोत यांच्या शेतात स्वतः ट्रॅक्टर चालवत मक्याची पेरणी केली.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निर्देशानुसार ‘अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर’ या उपक्रमांतर्गत लासुरगाव, शहाजतपूर, हडसपिंपळगाव, पिंपळगाव शिवारात तहसीलदार सावंत यांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. हडसपिंपळगाव येथील महेश मेंढे आणि किशोर साळुंखे यांचा रस्त्यावरील वाद मिटवून रस्ता मोकळा करण्यात आला. राहुल निघोटे आणि शिवाजी निघोटे यांच्या शेतावरही भेट दिली. वसंत हुमे यांनी रानडुकरांचा त्रास वाढल्याचे सांगितले. मक्याच्या बियाण्याचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले. यावर तहसीलदार सावंत यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून रानडुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. गावातील रानडुकरं पकडणाऱ्यांनाही सूचना दिल्या.
या वेळी मंडळ अधिकारी रीता पुरी, तलाठी प्रवीण पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब राहींज, पोलीस पाटील बाबासाहेब हरिचंद्रे, कारभारी निघोटे, कृषी विभागाच्या वनिता खडके, कल्पना गायसमुद्रे, आशोक नळे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी तहसीलदार सावंत यांचे आभार मानले.
चित्तेपिंपळगाव | काद्राबाद येथे अधिकाऱ्यांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पैठण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांनी शेतकरी रवी रामधन नायमने यांच्या शेतात भेट दिली. बियाणे वेळेवर मिळतात का, औषधे मिळतात का, पीक कर्ज मिळाले का, खताची लिंकिंग केली जाते का, यासह विविध प्रश्नांची माहिती घेतली. अधिकाऱ्यांची शासकीय गाडी शेतात आल्याने अनेक शेतकरी जमा झाले. शेतकऱ्यांनी बियाण्यांचे दर जास्त असल्याची तक्रार केली. महावितरणच्या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त केली. तारा शेतात लोंबकळत असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. शिवाजी साळुंके यांनी महावितरणला तत्काळ कळवले. या वेळी सरपंच इसाक पठाण, उपसरपंच विजयसिंग नायमने, माजी सरपंच मुनीर पटेल, शालेय अध्यक्ष हशम पटेल, ग्रामविकास अधिकारी माधव बसापुरे, ग्राम महसूल अधिकारी शीतल हिवराळे, शेतकरी रामधन नायमने उपस्थित होते.
प्रतिनिधी | फुलंब्री जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार फुलंब्री तालुक्यात सोमवार रोजी १४ गावांमध्ये १३ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट भेटी दिल्या. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदी करताना अडचण आहे का, शेतात जाण्यासाठी पाणद रस्त्यांची अडचण आहे का, पीक कर्ज मिळण्यात अडचण येते का, बांधावरून वाद आहेत का, बँका पीक कर्ज देत आहेत का, अशा विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडचणींचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवण्यात येणार आहे. कृषी विभाग, महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, पंचायत समिती, सहकारी संस्था विभागाचे अधिकारी सहभागी झाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.