
Mumbai News : हिंदीच्या मुद्द्यावरून आता भाजपनं देखील आक्रमक भूमिका घेतलीय. विरोधकांनी हिंदीविरोधात घेतलेल्या भूमिकेला भाजपकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती आखण्यात आलीय. हिंदीच्या मुद्द्यावरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच राज्यात हिंदी सक्ती नसून ऐच्छिक असल्याचंही भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय.
राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय. हिंदीविरोधात 5 जुलैला ठाकरे बंधूंनी मोर्चाची हाक दिलीय. त्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरून आता भाजपनं देखील रणनीती आखायला सुरूवात केलीय. हिंदीच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं राजकारण हाणून पाडण्यासाठी भाजपही अॅक्शन मोडवर आलीय. महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हिंदीच्या मुद्द्यावर चर्चा झालीय.
भाजप कोअर कमिटीची बैठक, हिंदीवर चर्चा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत मराठी, हिंदीच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, त्याचा प्रचार, प्रसार करण्यावर चर्चा झाली. मराठी भाषेला अभिजात दर्जा नरेंद्र मोदींनी दिला हे लोकांपर्यंत पोहोचवण्यावर बैठकीत चर्चा झालीये. विरोधकांकडून मराठी-हिंदी हा वाद आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला जातोय. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेलं राजकारण हाणून पाडण्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
हिंदीविरोधात राज, उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका यावर देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्य सरकारनं हिंदी सक्ती केली नाही, विरोधकांकडून चुकीचं चित्र निर्माण केलं जातंय.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी आणि हिंदीचा वाद विरोधकांकडून उकरण्यात येतोय. राज्यात भावनिक वातावरण तयार करून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. तसंच राज्यात पाचवीपासून हिंदी सक्ती कोणी केली? असा सवाल करत आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीका केलीय.
हिंदींच्या मुद्द्यावरून भाजप आमदार अमित साटम यांनी देखील ठाकरे बंधूंवर टीका केलीय. संपलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी हा भाषेवरून वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच त्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली ते सांगावं असं आव्हान देखील साटम यांनी ठाकरेंना केलंय. ठाकरे बंधूंच्या हिंदीविरोधातील भूमिकेवरून भाजपनं टीका केलीय. गमावलेली राजकीय पद आणि स्पेस परत मिळवण्यासाठी ठाकरेंची धडपड सुरू असल्याचा निशाणा भाजपनं साधलाय. दरम्यान यानंतर संदीप देशपांडेंनी देखील भाजपला प्रत्युत्तर दिलंय. हिंदीचं समर्थन करणारे महाराष्ट्राचे द्रोही असल्याची टीका संदीप देशपांडेंनी केलीय. हिंदीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरत अनेक सवाल देखील केले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेलं राजकारण हाणून पाडण्यासाठी आता भाजपकडून देखील रणनीती आखण्यात आली असून विरोधकांना जशास तसंच प्रत्युत्तर देण्यात येतंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.