
सीमा आढे, मुंबई, झी 24 तास : राज्य सरकारने पहिलीपासून सर्वसाधारणपणे हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. मराठीच्या रक्षणासाठी सर्व पक्षीय नेत्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र, काँग्रेस या आंदोलनापासून दूर राहत असल्याचे दिसत आहे.
5 जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही सुरुवातीपासूनच ठाम भूमिका घेतली आहे. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, परंतु मराठी भाषेवर कोणताही अत्याचार आम्ही होऊ देणार नाही. सध्या या निर्णयाच्या विरोधात अनेक आंदोलने होत आहेत. 5 जुलै रोजीचा मोर्चा हा एकमेव मोर्चा आहे, असे नाही. या मोर्चाला आमच्या शुभेच्छा आहेत.” असे म्हणत त्यांनी काँग्रेस या मोर्चात सहभागी होणार नसल्याचे संकेत दिले. तसंच, “आम्हाला आतापर्यंत कोणतेही निमंत्रण किंवा नेत्यांकडून फोन आलेला नाही,” असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मुळात सरकार 5 जुलै रोजीचा मोर्चा होऊच देणार नाही. त्यापूर्वीच सरकार हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेईल. विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सरकार हा निर्णय मागे घेऊ शकते,” असा दावाही त्यांनी केला.
LIVE | महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, श्री.हर्षवर्धन सपकाळ यांचा माध्यमांशी संवाद | मुंबई https://t.co/fDPkpCC5VA
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) June 28, 2025
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना मराठीच्या रक्षणासाठी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “हा मोर्चा कोणत्या एका पक्षाचा नसून मराठी माणसाच्या हिताचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसण्याची शक्यता आहे, त्यामुळे या मोर्चाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकजुटीने या आंदोलनाला सामोरे जात असताना काँग्रेसने मात्र या मोर्चापासून अंतर ठेवले आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.